25 September 2009

आम्ही जपानी बोलू कवतिके..! ---(२) (अंतिम)

खाऊन बघ ना!

मराठीत आपण अनेकदा सहज बोलतो...’हे खाऊन बघ ना जरा’...आता या ’खाऊन बघण्याच्या’ क्रियेत अर्थातच त्या एखाद्या पदार्थाची चव घेणे वगैरे अपेक्षित आहे. पण इंग्लिशमध्ये ही क्रिया आपण अगदी अशीच म्हणत नाही. आपण या क्रियेला ’taste it' किंवा ’try it’ म्हणतो. (Eat and see असं तर नाही म्हणत!) पण अर्थाने अगदी सारखी असणारी अश्शीच दोन क्रियापदं एकत्र वापरणारी ही ’खाऊन बघण्याची’ क्रिया जपानीत मात्र आहे. ’खाऊन बघ ना’ ला जपानीत ’ताबेते मिते (कुदासाइ)’ म्हणतात ज्यात 'ताबेते'(मूळ क्रियापद ’ताबेरु’) आणि 'मिते' (मूळ क्रियापद ’मिरु’) यांचा अनुक्रमे अर्थ चक्क ’खाणे आणि बघणे’च आहे! त्यामुळे जपानी शिकताना गाडी जेव्हा ’ताबेते मिरु’ या क्रियेशी आली तेव्हा चटकन वाटलंच ’अरे! हे तर आपलं ’खाऊन बघणे’! (आमच्या सेन्सेईंनी याला नाव ठेवलं होतं ’खाके देखो पॅटर्न’ Smile) (खाऊन बघण्यावरुन आठवलं, जपानीत ’चवी’ला काय म्हणतात माहित्ये? जपानीत ’चव’ म्हणजे ’आजी’!Smile आम्हाला लक्षात ठेवायला सोपं गेलं. ’आजी’च्या हातची चव आपण विसरु शकतो काय?)

या ’खाके देखो’ पॅटर्नमुळे अश्या प्रकारच्या मराठीतल्या इतरही जोड्या आपोआप जपानीतून एकेक करुन समोर येऊ लागल्या आणि अभ्यासातला रस वाढला. येताजाता मग आम्ही ’कीईते मीमास’ (मूळ क्रियापद ’किकु=विचारणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’विचारुन बघते/बघतो हं”, इत्ते मिते ने’ (मूळ क्रियापद ’इकु’=जाणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’जाऊन बघ ना”, यात्ते मियोs का (मूळ क्रियापद ’यारु’=करणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’करुन पाहूया का?’ असं जपानी सांडायचो! तेव्ह्ढीच प्रॅक्टीस!! परकीय भाषेत असे काही समान दुवे आढळले तर खरोखर ती भाषा शिकणं केवळ ’शिकणं’ राहत नाही तर तो एक ’अनुभव’ ठरतो! ’अभ्यासाला’ अभ्यासाचा कोरडेपणा रहात नाही तर तो एक रंगतदार, मजेशीर प्रवास होतो. असं काही साम्यस्थळ शिकलो की आम्हाला वाटायचं, मग आपण मराठीत अमुक अमुक असं म्हणतो, त्याला जपानीत काय बरं म्हणत असतील? अशी विचार प्रक्रीया चालू झाली की मग होतं ते ’सेल्फ़ लर्निंग’. स्वत:लाच मनाशी विचार करुन एकातून एक, एकातून एक अशी त्या भाषेतील शब्दसंपत्ती वाढवत नेता येते! त्यासाठी मग तुमचं मन आणि एक शब्दकोष इतकीच आयुधं लागतात! असो.

’खाऊन बघणे’ प्रमाणेच आपलं ’जाऊन येणे’ सुद्धा जपानीत आहे. ते इंग्लिशमध्ये नाही! ’जाऊन येते’ ला इंग्लिशमध्ये ’I will go and come (back)' असं म्हणण्यापेक्षा ’I'll be back!' असंच म्हटलं जातं नाही का! पण जपानीसुद्धा पटकन आपल्यासारखे ’इत्ते किमास’ म्हणजे अक्षरश: ’जाऊन येते/येतो’ म्हणून मोकळे होतात. यात मूळ क्रियापदे अनुक्रमे ’इकु’=जाणे व ’कुरु’=येणे आहेत!

यासारख्या साधर्म्याच्या बर्‍याच गोष्टी आजही भाषांतराची कामे करत असताना जाणवतात आणि तेव्हा अगदी वाटतंच की अमुक एखादं वाक्य मी इंग्रजीपेक्षा मराठीमध्ये अगदी तंतोतंत अर्थाने चपखल शब्द वापरुन भाषांतरीत करु शकेन. पण क्लायंटला मराठी कुठे येतंय!

नावात काय आहे!
आता तुम्ही म्हणाल, दोन भाषांमध्ये नावं/आडनावं सारखी असण्यात असं काय ते विशेष? असं साम्य असू शकतं की. खरंय. पण कोणी काहीही म्हणो, योगायोगाने काही जपानी आणि मराठी नावांमध्ये मजेशीर साम्य दडलंय.

’दाते’ हे असंच एक जपानी आडनाव. मला आठवतंय मी नोकरी करत असताना त्यावेळी ’दाते’ नावाच्या एका जपानी असामीचं आमच्या कंपनीत काही समारंभाच्या निमित्ताने येणं झालं होतं. (मला वाटतं तेव्हा ते मुंबईचे जपानी कॉन्स्युलर जनरल होते किंवा कॉन्स्युलेटमधील कुणी बडे अधिकारी होते) तेव्हा आमच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यक्तिने ’दाते’ हे जपानी नाव कसं असू शकेल असा विचार करुन त्यांच्या नावाचा उल्लेख चक्क ’डेट’ केला होता. अजून एक उदाहरण काकूंचं. काकू म्हणजे आपल्या बिल्डींगमधल्या काकू नाहीत बरं! ’काकू’ हेसुद्धा एक जपानी आडनाव आहे. आम्ही शिकत असतानाच्या सुमारास मुंबईत ’काकू’ नावाचे कॉन्स्युलर जनरल कार्यरत होते. त्यांच्या सौ. जपानी शिकवत असत असं ऐकलं होतं. त्यांचं आम्ही 'काकू'काकू आणि मिस्टरांचं 'काकू'काका असं नामकरण केलं होतं. Big Grin

उमा! मराठीतलं किती सुंदर नाव! (उमा म्हटल्यावर मराठी चित्रपटांमधल्या उमाबाईंचा सुंदर चेहेरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो) माझ्या बॅचला एक ’उमा’ नावाची मुलगी होती. योगायोगाने ती उमाबाईंची मुलगीच शोभावी अशी सुस्वरुप होती. पण तिचं हसणं मात्र चमत्कारिक होतं. थोडंफार खिंकाळल्यासारखं. आम्ही आपापसात तिच्या हसण्यावरुन चेष्टा करत असू आणि त्यातच जपानीत घोड्याला ’उमा’ म्हणतात हे ज्ञान प्राप्त झालं. मग काय! आम्हाला आयतंच हत्यार मिळालं उमाला जेरीस आणायला! Smile तर सांगायचा मुद्दा हा की जपानी नावांत/आडनावांतही गंमती दडलेल्या आहेत. ’उमा’ हे एक उदाहरण झालं. अशी अजूनही आहेत.

ऑफिसमध्ये एकदा एका सिनियर हुद्द्याच्या व्यक्तिचं आगमन होणार होतं. मी रिसेप्शनिस्टला विचारलं, "कोण गं"? ती म्हणाली "नाकानिशी". हे नाव ऐकताक्षणीच मला जाम हसायला आलं पण मुश्किलीने मी ते आवरलं. तरी पोरीच्या नजरेतून माझं दबलेलं हसू सुटलं नव्हतंच. तिने विचारलंच मला त्याबद्दल पण ’नाकानिशी’तली मराठी मजा त्या ख्रिश्चन पोरीला कशी मी समजावणार आणि काय तिला कळणार!

वर नावांबद्दल लिहिताना मला एकदा नावामुळे झालेला गोंधळ आठवला. (झालेला म्हणजे मी केलेला गोंधळ). तेव्हा मी नुकतीच भाषांतरकार म्हणून नोकरीस लागले होते. फ्रेशर असल्याने कामाचं जाम प्रेशर वाटायचं आणि त्या प्रेशरखालीच माझा गोंधळ झाला. आमची कंपनी जी मशिन्स बनवायची, त्यासंबधित सर्व टेक्निकल मजकूर (मग त्यात Drawingsपासून Manualsपर्यंत सर्वकाही मोडायचं) मी जपानी<->इंग्रजीत भाषांतरीत करत असे. एक दिवस एका डॉक्युमेंटमध्ये डिझाईन स्पेसिफिकेशन्समध्ये ’Usagi' असा शब्द आला. जपानीत ’Usagi’ म्हणजे ससा. आता त्या सर्व टेक्निकल जंजाळात सशाचा संबंध काय ते मला कळेना. बरं मागेपुढे धड संदर्भही नव्हता. मग मी सर्व शब्दकोश पालथे घातले, इंटरनेटवर शोध घेऊन बघितला पण कुठेही तसल्या टेक्निकल माहितीमध्ये सशाचा मागमूसही दिसला नाही. मग नंतर अचानक सुचलं, अरेच्चा! कदाचित ही लिहिणार्‍याची साधी स्पेलिंग मिस्टेक असेल. ही स्पेसिफिकेशन्स ’Usami' नावाच्या जपान्याने लिहिली आहेत. तर टाईप करताना ’उसामी’चं चुकून ’उसागी’ झालेलं दिसतंय.! हुश्श! म्हणजे सशाचा खरोखरीच संबंध नाहीये म्हणायचा!’

मी सुटकेचा नि:श्वास टाकला खरा पण मला वाटलं एकदा विचारुन खात्री करुन घ्यावी. मग मी सरळ जपानला फोन फिरवला आणि सांगितलं की माझ्या मते अशी अशी अशी नावाची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. यावर पलिकडल्या व्यक्तिच्या चेहेर्‍यावरचे भाव संभाषण फोनवरुन झाल्यामुळे मला बघता आले नाहीत पण मला त्याचा अंदाज आहे. शक्य तितक्या नम्रतेने त्याने सांगितलं. ’डॉक्युमेंटमध्ये ’ससा’च आहे. कारण आपल्या ग्राहकाला बाटलीवर सशाचं चित्र engrave करुन हवं आहे.’ हे ऐकून मी शक्य तितक्या त्वरेने फोन संभाषण आवरतं घेतलं Smile)

हो जा ’शुरु’!
जपानी शिकताना मला अजून एका क्रियापदाची गंमत वाटली होती. या क्रियापदाचं मराठीतल्या क्रियापदाशी थेट साम्य नसलं तरी मराठीतल्या त्या क्रियेशी जवळचं नातं मात्र नक्कीच आहे. जपानीमध्ये ’करणे’ किंवा ’To do' या क्रियेसाठी ’सुरु’ हे क्रियापद आहे. त्यामुळे त्यामुळे, "चला! परीक्षा जवळ येत चाललीय! आता अभ्यास ’सुरु’ करायलाच हवा" असं आपण म्हणावं आणि याच क्रियेला जपान्याने म्हणावे ’बेन्क्योs (अभ्यास) ’सुरु’! आहे की नाही!! आता अभ्यास हे एक उदाहरण झालं पण जपानीत इतरही असंख्य गोष्टी ’सुरु’च होतात. त्यात उठल्यापासून झोपेपर्यंतच्या असंख्य क्रियांचा समावेश होतो. मग ते ’सोजी’ (स्वच्छता करणं) असो किंवा ’काईमोनो’ (खरेदी) असो, जे काही आहे ते ’सुरु’च होणार. अर्थात जपानीतलं ’सुरु’ हे त्या क्रियापदाचं मूळ रुप असलं आणि काळानुसार त्यात बदल होत असला तरी एकंदरीत तोच मतितार्थ आहे.

याच ’सुरु’वरुन आठवलेलं अजून एक साम्यस्थळ म्हणजे ’सेवा’. आपल्या मराठीत ’सेवा’ शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो अगदी त्याच अर्थाने उच्चारासकट जपानी लोक जपानीत वापरतात. फक्त आपण एखाद्याची ’सेवा करतो’ तर जपान वर दिल्याप्रमाणे ’सेवा सुरु’ करतात. Smile पण त्या सेवेमागची भावना एकच आहे. काळजी घेणे! मदत करणे! इतकंच काय, बर्‍याच जपान्यांचा इमेल ’इरोइरो ओ-सेवा नी नारीमाश्ता’ ने सुरु होतो. म्हणजे काय तर, "खूप काही केलंत हो माझ्यासाठी, धन्यवाद बरं का’. (बाकी जपानी पद्धतीने कमरेत लवून आभारप्रदर्शन करायची स्मायली अजून कुण्या जपान्याने कशी काय तयार केली नाही कुणास ठाऊक. समोरच्याकडून इरोइरो सेवा घेतल्याबद्दल थॅंक्यू टायपल्यावर ठोकायला बरी पडली असती. Smile)

परवा कुठलातरी लेख वाचताना त्यात ’मज्जा येत्ये नै?’ मधल्या ’नै’ ची एकसारखी भेट होत होती. मला स्वत:ला यातल्या ’नाही?’ ला ’नै’ म्हणणे किंवा ’काहीच्या काही’ ला ’कैच्याकै’ म्हणणे इत्यादी प्रकार बोलण्यात तर दूरच पण लिहायलाही फारसे जमत नाहीत पण कुठे वाचण्यात आले तर मात्र वाचायला आवडतात. गंमतीशीर वाटतात. आणि मग हमखास यातल्या ’नै’च्या जपानी भावंडाची आठवण येतेच. Smile खरोखर, इथेही साम्य आहेच. कसं बघा हं. उदा. आपण खूपवेळा उदगारतो, अमुक एक गोष्ट ’मस्त आहे ना!’ त्यालाच जपानी म्हणतील ’सुगोइ ना!’. या ’ना’ चा उच्चार, अर्थ अगदी अगदी सारखा आहे आणि त्यामागची भावनासुद्धा! पण या ’ना’ व्यतिरिक्त जपानी कधीकधी ’ने’ पण वापरतात. हा ’ने’ आपल्याला आपल्या प्रश्नार्थक/उद्गारवाचक ’नाही?!’ ( आणि पर्यायाने ’नै’च्याही) जवळ नेतो. उदाहरणार्थ, ’कोरे वा ताकाई देस ने!’ म्हणजे ’हे महाग आहे नाही!’ (महाग आहे नै!). Smile

मी ज्या कंपनीत काम करत असे तिथे एकंदरीत बिगर मराठी जनता जास्त होती. त्यातही बिहारी, उत्तरप्रदेशी जास्तच. त्यापैकी काहीजण ट्रेनिंगनिमित्त जपानवारी करुन आले. तर आल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की जपानी बोली भाषा त्यांना त्यांच्या मातृभाषेसारखीच वाटतेय. हे त्यांनी मला बोलून दाखवलं. मला वाटलं म्हणजे जपानीचं केवळ मराठीशीच साम्य नाहीये तर! उदाहरणार्थ? मी गंभीरपणे विचारलं. तर एकजण म्हणाला, "हमार भासामें हम ’वा’ शब्द बहुत इस्तमाल करते है, लालूजींका भाषण तो सुना होगा आपने वर्साजी?" (या व्यक्तीने मला कधीही ’वर्षा’ म्हटलेलं नाही! कायम आपलं ’वर्साजी’च! असो.)
’जी हा सुना है". मी.
"बस्स्स! तो जापानीभी ’वा’ शब्द बहुत इस्तमाल करते है. जैसे की ’कोरे वा नान देस्का?’"
हे उदाहरण ऐकलं मात्र आणि बिहारी आणि जपानी भाषांतला शाब्दिक सारखेपणा गंभीरपणे जाणून घ्यायला आतुर झालेल्या मला हसूच आलं एकदम. वातावरण सैलावलं.
’कोरे वा नान देस्का?’ म्हणजे ’हे काय आहे?’ खरंतर. यात ’वा’ हा एक topic/subject indicating particle (अव्यय) आहे आणि ’नान’ म्हणजे ’काय’.
पण या बहाद्दरांना त्यातला ’वा’ हा त्यांचा बिहारी ’वा’ वाटला आणि ’नान’ म्हणजे काय ते सांगायला नकोच!Smile

मनात म्हटलं शेवटी प्रत्येकजण परकीय भाषेचे मातृभाषेशी कितपत लागेबांधे आहेत हेच शोधत असतो. मी तरी दुसरं काय करतेय!!!

--समाप्त--

*कांजी- जपानी भाषेत वापरल्या जाणार्‍या मूळच्या चिनी अक्षरांना ’कांजी’ म्हणतात.

02 June 2009

आम्ही जपानी बोलू कवतिके! -- (१)

त्यादिवशी युट्युबवर लेकासाठी योग्य अशी बडबडगीते शोधत असताना हे एक जपानी बडबडगीत सापडलं. "ओ-च्या ओ-च्या ओ-च्या च्या-च्या-च्या" अश्या गंमतीदार सुरुवातीने सुरु होणारं ते गीत एका लोभस जपानी चिमुरडीने मस्तपैकी डान्स वगैरे करुन छान सादर केलंय. (’जपानमध्ये सर्वात प्रेक्षणीय काय असेल तर ती मुले’ असं पुलंनी आधीच लिहून ठेवलं आहे त्याला स्मरुन त्या बाहुलीचं अधिक वर्णन करत नाही.) बडबडगीताचा अर्थ वगैरे समजून घेण्यापर्यंत चिरंजीव अद्याप पोचले नाहीयेत. पण ती चाल आणि ठेका आवडेल अशा हेतूने मी ते गाणं त्याला ऐकवलं आणि त्याला ते आवडलंही. तेव्हढ्यात ऑफिसमधून नवरोजी आले आणि चिरंजीव इतके कशात रंगलेत हे पाहत असताना त्याने मला विचारलं.

"कशावर आहे हे गाणं?"
आमच्याकडे मराठी/हिंदी/इंग्रजी सोडल्यास इतर काही अगम्य कानावर पडलंच तर ते बर्‍याचदा जपानी असतं हे आता त्याला कळलंय त्यामुळे गाणं जपानीच असणार अशी त्याची खात्री झालेलीच होती.
"म्हणजे?" मी.
"अगं म्हणजे काय विषय आहे गाण्याचा"
"ओह. अरे विषय आहे ’ओच्या’ म्हणजे आपला ’चहा’ रे!
"काय? जपानीत चहा ला ’ओच्या’ म्हणतात?"
"हो. आपला ’चहा’ तर त्यांचा ’च्या’. म्हटलं नव्हतं मी तुला मराठी आणि जपानी सारखी आहे म्हणून?" मी. (बाकी मला ’च्या’ म्हटलं की मराठी चित्रपटातली ’च्या घ्येनार का’ विचारणारी ठसकेबाज रंजनाच आठवते!)

यावर ’हा एक शब्द जरा मिळताजुळता असला तर काय लगेच भाषा अश्या सारख्या होतात काय’ असं त्याच्या चेहेर्‍यावरचं उमटलंय की कायसं मला वाटलं. तेव्हढ्यात चहा आणायला तो आत गेला. चहाचा कप घेऊन निवांत बसल्यावर मला म्हणाला, "पण मग ही ’ओ’ ची काय भानगड आहे?"
’ओ’ची भानगड? म्हंजे?" मला कळेना.
"अगं तूच मघाशी नाही का म्हणालीस ’ओ-च्या’. पण नंतर नुसतंच ’च्या’ म्हणालीस. म्हणून म्हटलं ही ’ओ’-’च्या’ ची भानगड काय?" हा म्हणाला.
"अरे ते होय! जपानीत ’ओ-’ हा एक आदरार्थी प्रत्यय आहे. जिथे आदर व्यक्त करायचाय अशा बर्‍याच ठिकाणी त्या त्या शब्दाआधी ’ओ-’ प्रत्यय लावतात जपानीत." माझा खुलासा.
"अच्छा". माझा खुलासा ऐकून अधिक खोलात जायच्या भानगडीत तो अर्थातच पडला नाही.

यावरुन मला मी जपानी भाषा नुकतीच शिकायला सुरुवात केली होती ते दिवस आठवले. साधारण ९-१० वर्षांपूर्वीचा काळ. काहीवेळा क्लासमध्ये हास्याची कारंजी उडायची.
"’ओ-च्या’ चं शब्दश: भाषांतर केलं तर काय होईल?" आमची एक सहध्यायिनी.
"(तुमचा) आदरणीय चहा!". कुणीतरी उत्तरलं आणि तेव्हाचा हशा आठवून मला आत्ताही हसू फुटलं. आता आदरणीय व्यक्ती असावी पण चहासुद्धा आदरणीय असतो का?
चहावरुन अजून एक उदाहरण आठवलं. ’ओ-सारा’.
’सारा’ म्हणजे ’बशी’. मग ’ओ-’ लावल्याने तीसुद्धा आदरणीय झाली म्हणायची! अजून उदाहरणं म्हणजे ’ओ-नामाए’ (नाव), ओ-शिगोतो (जॉब), ’ओ-तान्ज्योबी’ (वाढदिवस) आणि अशीच अजून चिक्कार आहेत. अशा प्रकारे बहुतेक निर्जीव गोष्टींना हा आदरार्थी प्रत्यय लावून खिदळायला आम्हाला एक चांगलं निमित्त सापडलं होतं. हे ’आदरणीय’ प्रकरण आम्ही पुढे बराच काळ आपापसात बोलताना मुद्दाम वापरत होतो. बाकी पुढे नोकरी लागल्यावर भारतीय बॉसला आणि इतर सर्वसामान्य जनतेलाही कळू नये ’असं काही’ बोलायचं असलं की आम्ही जपानीत बोलत असू. नव्हे, अजूनही बोलतो! आदरणीय (!) बॉसबद्दल बोलताना तर खाशी मज्जा यायची!;)

’च्या’च्या निमित्ताने मराठी आणि जपानी भाषांतील साम्यस्थळांची (स्थळं म्हणजे शब्द, वाक्प्रचार वगैरे) परत एकदा उजळणी करुन झाली आणि त्यातली गंमत तुमच्याबरोबरही शेअर करावीशी वाटली म्हणूनच हा लेखनप्रपंच! काय आहे की इंग्रजी आणि जपानी अगदी पूर्णपणे भिन्न भाषा आहेत. अगदी लिपीपासून ते उच्चार, व्याकरण इ. सर्व बाबींमध्ये या दोहोंत काडीचंही साम्य नाही. त्यामानाने मराठी जपानीला खूपच जवळची आहे. खासकरुन व्याकरणदृष्ट्या. (अर्थात लिपी पूर्णपणे वेगळी आहे) मराठीप्रमाणेच जपानीतही वाक्यातील पदांचा क्रम सारखाच आहे-कर्ता-कर्म-क्रियापद. जपानीतील अव्यये (particles) मराठीतील ’ऊन’, ’हून’ किंवा ’चा’, ’ची’, ’चे’ अश्या प्रत्ययांशी साम्य दाखवतात. या दोन्ही भाषांतल्या साम्यस्थळांमधला अजून एक समान धागा म्हणजे एखादा शब्द किंवा वाक्प्रचार अर्थाने किंवा उच्चाराने किंवा दोन्ही गोष्टींनी मराठीत आणि जपानीत एकच किंवा जवळपास सारखा असणे. हे साम्य जाणून घेणं नक्कीच मनोरंजक आणि गंमतीशीर आहे. कसं ते बघूया.

का???? का!!!!!

आता ’च्या’ पिऊन आपण सुरुवात केलीच आहे तर माझ्या सर्वात आवडत्या साम्यस्थळाकडे जाऊया. पुलंनीही याविषयी ’पूर्वरंग’ मध्ये नमूद केलंय. ते म्हणतात ’जपानी ’का’ आणि मराठी ’का’ चा अर्थ एकच असावा.’ आणि ते अक्षरश: खरं आहे!



मराठीतला ’का’ आणि जपानीतला ’का’ अर्थाने आणि उच्चाराने अगदी सारखा आहे. गंमत म्हणजे मराठीप्रमाणेच जपानीतही तो प्रश्नार्थकच आहे आणि मराठीसारखाच तो वाक्याच्या शेवटी येतो! उदा. ’पारी ए इकिमाश्ता का’ म्हणजे ’पॅरीसला गेला होतास/होतीस का?’ मधला ’का’ एकच काम करतो. प्रश्न विचारणे! (फक्त एकच फरक आहे, प्रश्नार्थक ’का’ नंतर आपण प्रश्नचिन्ह देतो तर जपानी पोकळ टिंब देतात.[。]असं. पण आताशा प्रश्नचिन्हही जपानीत वापरतात). इतकंच काय, मराठीतल्या या प्रश्नार्थक ’का’ मागे कधीकधी काही भावना किंवा हेतूही असतात उदाहरणार्थ, ’तुझं पुस्तक मी वाचलं तर चालेल का?’ (परवानगी/संमती मागणे), ’पण तू तिला असं म्हणालासच का? (संताप व्यक्त करणारा प्रश्न). या सर्व भावना जपानी ’का’ तूनही व्यक्त होतात, अगदी हुबेहूब!

याशिवाय अजून एक उदाहरण. कधी कधी आपण एखादी गोष्ट ऐकल्यावर ’हो का!’, ’असं का!’ म्हणून उद्गारतो. आता या ठिकाणी ’का’ प्रश्नार्थक नसून उद्गारवाचक आहे. अगदी हाच प्रकार जपानीतही आहे. ते म्हणतात ’सोs देस का!’ किंवा नुसतंच ’सोs का!’. तर या जपानी 'का!'चं कामसुध्दा अगदी तेच बरं का! उद्गारणे!! उदाहरणार्थ,
’गो-नेन गुराई निहोननी इमाश्ता’.
’सोs देस का!
म्हणजेच,
’जवळपास ५ वर्षे मी जपानमध्ये होते/होतो’
’असं का!
अजून गंमत म्हणजे आपण कधी कधी मुद्दाम ’हो का!’ च्याऐवजी ’होक्का!’ म्हणतो ना तर जपानी ’सोक्का!’ म्हणतात. :)

बरं ’का’चा महिमा इथवरच संपत नाही. आपण मराठीत कित्येकदा म्हणतो ना,"अमुक अमुक असं करुया का? का तसं करुया?" (किंवा आपण या ’का’ ऐवजी ’की’सुद्धा वापरतो). तर या ’का’ किंवा ’की’ने दोन प्रश्नार्थक पर्याय जोडण्याचं जे काम पार पाडलंय तेच काम जपानीतही तस्संच पार पाडलं जातं. उदाहरणार्थ, ’कोरे का सोरे’ (म्हणजे ’हे ’का’ ते?’)

जपानी शिकायला लागल्यावर लगेचच या साम्यस्थळाशी गाठ पडली होती....मला वाटतं आमच्या पहिल्या धड्यात ’आनाता वा निहोन्जीन देस का’ (तू जपानी आहेस का?) असं काहीसं वाक्य होतं आणि तेव्हाच आमच्या सेन्सेईंच्या* ’जपानी बोली बरीचशी आपल्या मायबोलीशी मिळतीजुळती आहे’ या सांगण्यावर आम्ही शिक्कामोर्तब करुन टाकलं होतं!

क्रमशः

*सेन्सेई= शिक्षक

17 November 2008

संस्मरणीय निसर्ग!

परवा गप्पांच्या ओघात विषय पूर्वी, शाळा-कॉलेजात असताना पाहिलेल्या जाहिरातींकडे वळला. जाहीरातींची उजळणी करुन विषय मालिका...त्यांची शीर्षकगीतं..त्यातील कलाकार असा प्रवास करत करत चित्रपटांपर्यंत आला. चित्रपटांचंही दळण व्यवस्थित दळून झाल्यावर एका क्षणी विषय अचानक शैक्षणिक, शास्त्रीय कार्यक्रमांकडे वळला आणि मग थेट कंट्रीवाईड क्लासरुम पासून टर्निंग पॉईंटपर्यंत आठवणींना उजाळा देत देत विषय नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरी पर्यंत येऊन पोचला. केबल नव्हता तेव्हा रविवारी लागणार्‍या National Geographic सिरीजवर समाधान मानलेलं असायचं. (अवांतर १) मग नंतर विषय आपसूकच माझ्या आवडत्या वाईल्ड लाईफ, नेचर डॉक्युमेंट्रीजपर्यंत आला. तेव्हा लख्खकन एक आठवण झाली.....लहानपणीच्या रंगीत विश्वात एका वेगळ्या दुनियेची सैर घडवून आणणारा...निसर्गाकडे डोळे उघडून बघा सांगणारा, बाबांचं बोट धरुन इरॉसला पाहिलेला एक छान चित्रपट आठवला.

तो चित्रपट, इतक्या काळानंतर (कमीत कमी वीस वर्षांनंतर) पहायच्या आलेल्या उर्मीने लगेच blockbuster videosकडून मागवला. नामीब, प्री-नामीब, कलहारी वाळवंट आणि कुबांगो नामक नदी या त्रिकुटातील वन्यजीवनाचं रौद्र, थरारक, रंजक, कधीकधी मजेदार आणि प्रसंगी कारुण्यमय चित्रण ज्या विलक्षण प्रकारे केलं गेलंय ते पाहिलं की थक्क व्हायला होतं. चित्रपटाची सुरुवातच वाळूचा एकेक कण सुटा असणा‍र्‍या आणि मैलोगणती पसरलेल्या लालसर करड्या नामीब वाळवंटात होते. हे आहे Red Namib. तो रखरखाट पाहून तिथे असं काय वन्यजीवन असणारे असं वाटेस्तोवर त्या वाळूवर चिमुकल्या दोन, तीन किंवा जास्त पायांनी उमटत गेलेली नक्षी दिसते आणि मागोमाग त्या पाऊलखुणांचे मालक हळूहळू दर्शन देतात. मुंगीपासून सापापर्यंतची विविध प्रजा तिथे नांदत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर अक्षरं उमटतात ’Animals are beautiful people'!

हा चित्रपट (खरं तर डॉक्युमेंट्री) मनात घर करुन रहायला वन्यजीवांचं विस्मयजनक चित्रण इतकं एकच कारण नाही. तसं असतं तर अजून कैक वाईल्ड लाईफ़वर आधारित उत्तमोत्तम चित्रपट/लघुपट आहेत जे लक्षात रहायला हवे होते. पण यात मला आवडलं ते चित्रीकरणाबरोबरच, प्रसंगांना साजेसं असं पार्श्वसंगीत. दिग्दर्शक Jamie Uys यांनी चक्क क्लासिकल ट्रॅक्स वापरलेत. काही जागी ते इतके चपखल वाटतात..उदाहरणार्थ, रखरखीत वाळवंटात पावसाच्या आगमनाने जेव्हा अगणित तर्‍हेच्या फुलांचं नंदनवन फुलतं तेव्हा मागे ऐकू येणार्‍या त्या आननंददायी सुरावटींनी आपलंही मन उचंबळून येतं. (तसं नंतर वाटलं होतं साऊंड ऑफ म्युझिक बघताना) तसंच चित्रपटाच्या शेवटीही पावसाने आनंदित झालेले पशुपक्षी त्यांच्या परीने तो आनंद दर्शवतात तेव्हाचं संगीत खरोखर साजेसं असंच आहे. वन्यजीवनातील मजेशीर घडामोडीही चित्रपटात तितक्याच रंजक दाखवल्या आहेत आणि साथीला narratorची मार्मिक, गंमतीशीर माहिती. उदाहरणार्थ, टोकदार काट्यांनी मढलेल्या साळींदराच्या बीळाचं तोंड हे एकावेळी एकच साळींदर आत शिरु शकेल एव्हढंच असतं खरंतर. पण हे त्यांना कळलं तर ना! मग दोन साळींदरं एकदमच एकत्र आत शिरु बघतात आणि मग काय धड ना आत धड ना बाहेर पडता येत! तेव्हा कानावर शब्द पडतात ’Porcupines should know better than anyone...not to enter in the house at the same time!' अजून एक प्रसंग. ’आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ अशी काहीशी आपली एक म्हण आहे. पण ती खरी ठरत असली तर? ’मरुला’ नावाच्या झाडाची आंबलेली फळे जेव्हा माकडं आणि इतरही प्राणी खातात तेव्हा त्याच्या ’गुणधर्माने(!) झिंग चढलेली बबून्स बघून ही म्हण खरी ठरतेय असं म्हणावसं वाटतंच. (अवांतर २)

नाही म्हणायला चित्रपटात काही ठिकाणी animationचा आधार घेतलाय हे स्पष्ट दिसतं. कदाचित त्या घटनेचं चित्रिकरण काही कारणाने घेता आलं नसेल. उदा. वाळवंटातल्या त्या कुठल्याश्या एका झाडाच्या (झाडाचं नाव विसरले) बिया ते झाड खूप जपून ठेवतं आणि जसा पाऊस येतो तशी ती फुलं/फांद्या उकलून त्यातल्या बिया बाहेर फेकल्या जातात. या बिया ऍनिमेटेड असल्याचं सहज दिसतं. किंवा पुढेही एके ठिकाणी एक बबून उत्सुकतेपोटी एका बीळात हात घालतं. त्या हात घातल्यानंतरचं बीळाच्या आतल्या भागाचं चित्रण ही animatedच आहे.

पण असं असलं तरीही हे अपवादात्मक प्रसंग सोडता सबंध लघुपटात काहीही मुद्दाम घडवून आणलेलं वाटत नाही. किंवा काहीतरी घाईघाईत चित्रिकरण करुन प्रेक्षकांच्या माथी फिल्म मारली आहे असंही वाटत नाही. (तब्बल ४ वर्षे लागली हा लघुपट बनायला असं कुठेसं वाचल्याचं स्मरतं). क्रौर्य, प्रेम, कारुण्य, दु:ख, संघर्ष, अपार कष्ट इत्यादी विविध छटा दिसणार्‍या वन्यजीवनात इतरही किती आश्चर्यकारक घटक आहेत हे बघून खरोखर निसर्ग किती महान आहे याची खात्री पटते. प्राण्यापक्ष्यांच्या natural adaptability साठी भक्ष्य पकडण्यासाठी किंवा भक्ष्य होण्यापासून वाचण्यासाठी निसर्गाने त्यांना काय काय क्लृप्त्या दिल्यात हे बघणं खूपच मनोरंजक आहे. गॅकोनामक एक पालीसारखा प्राणी खाणारा 'sidewinder' नावाचा वाळवंटी साप स्वत:ला वाळूमध्ये चक्क पूर्णपणे गाडून घेतो. आपल्या शेपटीचं टोक तेव्ह्ढं दिसेलसं वर ठेवतो. आता ते टोक हे गवत आहे असं समजून मुंगी तिथे येते....narrator सांगतो,,’now snakes don't eat ants but geckos do and snakes eat geckos..'आणि शेवटी जीवो जीवस्य जीवनम या न्यायाने sidewinderची भोजनाची सोय होते. शॅमिलिओन...शाळेत ब‍र्‍याचदां घोकलेलं नाव...या साहेबांचे डोळे स्वतंत्ररीत्या काम करतात. एकाच वेळी दोन्ही डोळे वेगेवेगळ्या गोष्टी लीलया बघत असतात..narrator म्हणतो ’He must be the only creature in the world whose left eye doesn't know what his right eye is doing!' Smile

मला या चित्रपटातला सर्वात भावलेला (खरं तर डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग आहे हा) प्रसंग आहे पेलिकन पक्ष्यांचा. कुबांगो नदीच्या कृपेने भर प्री-नामीब वाळवंटात चक्क एक तळं आणि तळ्याभोवताली जंगल तयार होतं. पण निसर्गाच्या नियमानुसार सूर्याची दाहकता कमाल मर्यादा गाठते आणि तळं ठार शुष्क होतं. तेव्हा यात वस्तीला असलेले पेलिकन पक्षी सरळ आपल्या पिल्लांना वार्‍यावर सोडून स्थलांतर करतात! उडू न शकणारी ती बिचारी पिल्लं ओळीने चालत रहातात..त्या विस्तीर्ण वाळवंटात...मृगजळाच्या मागे! निसर्गाच्या या क्रूर खेळापुढे मग चित्त्याची शिकारही कमी क्रूर वाटते!.

चित्रपटातला हा किंवा इतरही अनेक प्रसंग एकापेक्षा एक आहेत. आज तब्बल वीस वर्षांनीही हा चित्रपट तितकाच आनंद देतो हेच त्याचं मोठं यश आहे. मग भलेही टेक्निकली आजच्या डॉक्युमेंट्रीज इतका सरस नसेलही आणि कदाचित बालपणीतल्या सर्वच गोष्टींच्या आठवणी जश्या जास्त जवळच्या वाटतात त्याचप्रमाणे या चित्रपटालाही माझ्या बालपणीच्या काळाची एक अदृश्य झालर आहे, त्यामुळे म्हणा हा चित्रपट माझ्या काही ’अनफर्गेटेबल्स’मध्ये मोडतो आणि तो पाहून मिळणार्‍या आनंदासाठी पुन:पुन्हा नव्वद मिनीटे खर्चायची माझी अवश्य तयारी आहे!

अवांतर १: वर NGचा विषय निघालाच आहे म्हणून...तेव्हा दूरदर्शनवरील त्या सिरीजमध्ये एकदा एक अजब विषय होता. आपल्या दृष्टीआड असलेली अद्भुत दुनिया! उदा. तळ्यात पावसाचा एखादा थेंब पडणे....आपल्याला वरवर इतकीच क्रिया दिसते...पण आपल्या डोळ्य़ांपेक्षा अनेक पटींनी जास्त ताकद असलेल्या सूक्ष्मदर्शकाने किंवा अशाच कसल्या तरी आयुधाने पाहिलं तर तो थेंब पडल्यावर त्याच्या भोवताली बराच हल्लकल्लोळ माजलेला असतो....पाण्याच्या लाटा काय उसळतात..कारंजी काय उडतात...फारच रंजक, मनोहर आणि अदभुत होता तो भाग! कधी पहायला मिळेल ते पुन्हा?! असो.

अवांतर २: या चित्रपटात अगदी हत्तीसुद्धा ही फळं खाऊन झिंगतात असं दाखवलंय पण ही बाब वादग्रस्त आहे... जाणकारांच्या मते हत्तीच्या इतरत्र अवाढव्य खाण्याने आणि पाणी पिण्याने त्या फळांचा मादक अंश निश्चितच कमी होतो आणि त्यामुळे त्याची नशा चढून हत्ती झिंगणे हे शक्य नसावं.

03 November 2008

निहोन नो र्‍योरी... अर्थात, जपानी खाद्यजंत्री


खरंतर जपानी खाद्याविषयी लिहायला मी तितकीशी योग्य व्यक्ती नसेन. कारण माझ्यासारख्या शाकाहारी व्यक्तिने जपानसारख्या मिश्राहारी आणि त्यातही खासकरुन सीफूडप्रेमींच्या स्वर्गात जाऊनसुद्धा ती रंगीतसंगीत सामिष भोजने फक्त पाहण्याचं काम पार पाडलं होतं. पण तेव्ह्ढ्यावर गप्प बसणार्‍यातली मी नसल्याने (आणि गप्प बसणे परवडण्यासारखेही नसल्याने) मी यथावकाश तिथल्या इन मीन का होईना पण शाकाहारी पदार्थांचा, ती मिळणार्‍या रेस्टॉरंट्स किंवा दुकानांचा स्वत: जाऊन, मित्रमैत्रिणींकडून खबरा मिळवून आणि आंतरजालावर भ्रमंती करुन शोध लावल्यावरच मी स्वस्थ झाले कारण शेवटी भारतातून आणलेला स्टॉक फार काही पुरला नसता त्यामुळे हा शोध घेणं क्रमप्राप्तच झालं होतं आणि त्यायोगे नवीन शाकाहारी खाद्य खायला आवडणार्‍या माझ्यातल्या खवय्यालाही ही एक नामी संधी आयतीच चालून आली होती.

जपानला निघण्यापूर्वी कोणीतरी म्हणालं "अगं पण तिथे राहणं तुला ’झेपणार’ आहे का?" प्रश्नाचा रोख अर्थातच मी शाकाहारी असण्याकडे होता. तेव्हा मी मनात हसले. वाटलं, ज्या देशात जायचं माझं स्वप्न होतं तिथे जाण्याची जी संधी मिळतेय त्यापुढे दोन वेळचं खाणं ही काय चीज आहे! अरे हाय काय, नाय काय. आपण ऍडजस्ट करु शकूच. पण विचारांती, रोजचं दोन वेळेचं जेवण ही अगदीच क्षुल्लक बाब नसल्याचं जाणवलं. कारण अडीअडचणीला धावून येणारा नाक्यावरचा उडुपी नव्हता तिथे की वडापाव हादडायला मराठी ’हाटेल’! त्यातच भारतात ऑफिसमधून घरी आल्यावर आईच्या हातचं आयतं खायची सवय! तिथे ऑफिसमधून दमून घरी येऊन स्वयंपाक करायला जमणारे का? तेही रोज? नाही जमलं तर? बाहेर खाण्यावाचून पर्याय नाही. पण मग तयार आहेस ना आजपर्यंत जे खाल्लं नाही ते खायला?
इथपर्यंत विचारांची गाडी आली तेव्हा मन साशंक झाल. पण नंतर विचार केला की समजा दहा पदार्थ असले तर त्यातले निदान दोन तरी शाकाहारी असतीलच की! (आणि ते पुढे खरंही ठरलं. कुठेही गेलं तरी जपानी भात आणि सॅलड बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध असायचंच, मग फक्त दही घेतलं की काम झालं) आणि शिवाय जरी मी ’शाक’ आहारी असले तरी माझ्यासमोर कुणी सामिष खायला माझी कधीच हरकत नव्हती आणि सामिष दर्प नकोसे वाटले तरी शक्य झालं तर ते टाळणे, दुर्लक्ष करणे व शेवटी सवय करुन घेणे हे उपाय असतातच. त्यामुळे खाणेपिणे हा एक अंमळ महत्त्वाचा प्रश्न सुटल्यावर वाटलं, आता मी जपानला जायला खरी तयार झालेय.

यथावकाश जपानला जाऊन थडकले. पहिला आणि दुसरा आठवडा भारतातून आणलेल्या स्टॉकमध्ये भुरकन उडून गेला. गेल्या आप्तांच्या नावे टीपं गाळणं मला चालण्यासारखं नव्हतंच त्यामुळे उसासे न टाकता एक आढावा घेतला की स्टॉकमधे काय काय शिल्लक राहिलंय. तेव्हा लक्षात आलं की फोडणीचं साहित्य, एक लोणच्याची बाटली आणि एक मॅगीनूडल्सचं पाकिट एव्ह्ढीच सामग्री उरलेली आहे. पैकी मॅगी पाहून माझी कळी खुलली. केवळ २ मिनिटात होणारा एव्हढा रुचकर पदार्थ दुसरा नसेल! सहाजिकच मॅगी संपायला वेळ लागला नाही आणि तो शेवटचा घास खाताना मला आठवलं की मिळत असती तर नुसती मॅगीच्या मसाल्याची बरीच पाकीटं इथे आणायला हवी होती. कारण नूडल्स मला इथे आरामात मिळाल्या असत्या. कालच मॉलमध्ये फक्त नूड्ल्सची एक स्वतंत्र आईल पाहिली होती. मग काय, मी तिन्हीत्रिकाळ जपानी नूडल्स आनंदाने खाल्ल्या असत्या आणि स्वयंपाकाला मस्त टांग मारता आली असती.

पण हाय! मॅगी मसाल्याचं शेवटलं पाकीटही अंतर्धान पावलं होतं. आणि आता मी जपानी मॅगी शोधून काढण्याची कामगिरी अंगावर घेतली. ऑफिसहून परतायच्या वाटेवरच ’इतो योकादो’ मॉलचा उडणारा पक्षी खुणावायचा. शोधमोहिम इथूनच चालू करावी असा विचार करुन आत शिरले आणि सरळ नूडल्सच्या आईलशी जाऊन उभी राहिले. तिथे असलेल्या असंख्य पॅकेट्स वरुन नजर फिरवली आणि ही शोधमोहिम आपला चिक्कार वेळ खाणार हे लक्षात आलं. एक धावती नजर फिरवल्यावर लक्षात आलं की इथे ’सोबा’ आणि ’उदोन’ हे नूडल्सचे दोन प्रमुख प्रकार दिसतायत.

’सोबा’ नूडल्स बकव्हीटपासून तयार करतात. (तोपर्यंत बकव्हीट हे नाव नुसतं ऐकण्यात आलं होतं. खरा काय प्रकार आहे हे विकीने (म्हणजे विकिपिडिया बरं) सांगितल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. बकव्हीट आणि व्हीटचा म्हणजे गव्हाचा काहीही संबंध नाही! काय गंमत आहे, जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा आपल्याशी आमनेसामने एन्काउंटर होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीविषयी जाणून घ्यायची आपल्याला गरज वाटत नाही. सोबा जर बकव्हीटपासून बनत नसत्या तर मी कशाला विकीवरुन त्याची माहिती काढली असती?!!) या नूडल्स बर्‍याच सडपातळ वाटल्या (उदोनच्या तुलनेत) पण आपल्या शेवयांइतक्या नाजूक नव्हेत. अर्थात नूडल्सच्या लांबीरुंदीने मला काहीही फरक पडत नसल्याने मी सोबाच घ्यायचं ठरवलं. पण लगेच दुसरी अडचण उभी राहिलीच. कितीही शोधलं तरी प्लेन सोबा दिसेनात. बरीचशी पॅकेट्स सोबा नूडल सूपची दिसत होती. म्हणजे त्या नूडल्स कुठल्याश्या मसाल्यात तरी घोळवलेल्या किंवा ब्रॉथमध्ये बुडवलेल्या. आता आली का पंचाईत! तासभर त्या सोबा वाचनालयात घालवल्यावर माझा पेशन्स संपला. आजूबाजूला नजर फिरवली. एक जपानी मावशी दिसल्या. त्यांना माझी अडचण सांगितली. मी जपानीत बोलतेय यामुळे की काय पण तोंडभर हसून आनंदाने त्यांनी मला माझ्या इच्छित कोरड्या नूडल्स दाखवल्या. त्या बघून माझा जीव भांड्यात पडला. मी चक्क आपला शेवयांचा उपमा असतो तसा शिस्तीत फोडणी करुन कांदा वगैरे घालून सोबाचा उपमा करायचे. एकंदरीत माझा स्वयंपाकाचा मोठाच प्रश्न सोबाने सोपा करुन टाकला होता. त्या दुसर्‍या ’उदोन’ नावाच्या नूडल्स म्हणजे सोबाचीच एक बहीण...पण या नूडल्स चपट्या आणि जाडसर असतात आणि यामात्र गव्हापासून बनतात. उदोनची चव मला तितकीशी आवडली नव्हती.

’उदोन’ आणि ’सोबा’ या नूडल्सना जपान्यांच्या जीवनात मासे किंवा भाताइतकाच महत्त्वाचा स्थायीभाव असल्याचं मला वाटू लागलं. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेकदा सोबा किंवा उदोनचं दर्शन होत असे. या नूडल्स मिळणारी उपहारगृहे आपल्या उडुप्यासारखी नाक्यानाक्यावर दिसायचीच पण शिवाय रेल्वेस्टेशनवरही बर्‍याचदां दिसत आणि ऑफिस लंचटाईम किंवा संध्याकाळी ती खूप गजबजलेलीही असत. फक्त ’मे. गुप्ता एन्ड कं’.किंवा ’क्षुधाशांती उपहारगृह’ असल्या पाट्यांऐवजी तिथे ’सोबा - या’ किंवा ’उदोन - या’ असं लिहिलेलं असे. (जपानीत ’- या’ हा प्रत्यय दुकानासाठी लावला जातो. सोबा मिळण्याचं दुकान म्हणजे ’सोबा - या’. यामध्ये ’खायला’ शब्द टाकून ’सोबा - खायला - या’ असं त्याचं नामकरण करायला हरकत नाही असं मला सुचलं) पण याव्यतिरिक्त आमच्या ऑफिसमध्येही लंच टाईममध्ये लोक कॅन्टिनमध्ये सोबा किंवा उदोन ओरपताना दिसत. कॅन्टिनच्या बाहेर ’आजचा मेनू’ दाखवणार्‍या बोर्डावर रोज हमखास सोबा किंवा उदोनची पाककृती दिसणारच. आणि ते वाचणार्‍या प्रजेतून ’सोबा का! उदोन का!’ असे उद्गार ऐकू यायचे!. जपानीतला ’का’ आणि मराठी ’का’ चा अर्थ एकच आहे त्यामुळे "(अच्छा! आज) उदोन का!" किंवा "(अच्छा! आज) सोबा का!" असाच त्याचा अर्थ होतो. पण पहिल्या दिवशी मात्र कॅन्टिनमधला प्रकार बघून (खरं तर ऐकून) अचंबा वाटला. सर्व लोक नूडल्स खाताना प्रचंड आवाज करत होते! चॉपस्टिक्सच्या चिमटीत नूडल्स पकडून त्यांची एक बाजू तोंडात घालायची आणि सर्रर स्स आवाज करीत त्याचा उर्वरीत भाग तोंडाने ओढून घ्यायचा! (slurp!) पण हे तुमच्या विनम्रतेचं एक लक्षण आहे म्हणे! अजबच आहे!! सोबा आणि उदोन व्यतिरिक्त ’सोमेन’ नावाच्या पातळ पांढर्‍या नूडल्सही जपानी नूडल वर्गातील अजून एक मानकरी ठरतील. बहुतेक वेळेस या थंडगार खाल्या जातात आणि बुडवून खायला सोबतीला सॉस असतोच. शिवाय ’रामेन’ नावाच्या मूळच्या चिनी नूडल्सही मोठ्या प्रमाणावर मिळतात. (ह्या 'रामेन' नूडल्स पाहून मला आपल्याकडे मिळणारा ’टॉप रेमन’ (Top Ramen) नामक मॅगी नूडल्ससारखाच एक प्रकार आठवला. तो म्हणजे याच नूडल्स की काय कोण जाणे!!)

यावरुन आठवलं, जपानमध्ये सोबा आणि इतरही खाद्यप्रकार हे चॉपस्टिक्सनेच खाल्ले जातात. आता चॉपस्टिक्स हे एक स्वतंत्र प्रकरणच आहे. जपानीत यांना ’हाशी’ म्हणतात. हा जपानी संस्कृतीतला एक अविभाज्य घटक म्हणता येईल. (खरं तर जपानच काय पण चीन, कोरिया, व्हिएतनाम, तैवान या देशांतही चॉपस्टिक्स वापरण्याची परंपरा जुनी आहे. चॉपस्टिक्सचा जन्मच मुळी चीनमध्ये झाला) खरं तर एकंदरीत जपान्यांवर असलेला अमेरिकेचा प्रचंड पगडा जाणवतो पण त्यांचे काटेचमचे मात्र त्यांनी कसे काय उचलले नाहीत याचं आश्चर्य वाटतं. जुनीच नव्हे तर नवीन पिढीसुद्धा चॉपस्टिक्सच वापरताना दिसते! तिथे मीसुद्धा हौशीने चॉपस्टिक्स वापरुन खायला सुरुवात केली होती. वाटतो तेव्ह्ढा कठीण प्रकार नाहीये तो. त्याचं एक टेक्निक आहे, ते लक्षात ठेवलं की मामला सोपा आहे. पण त्या चॉपस्टिक्स वापरुन खाण्यापेक्षा त्यांच्याकडे बघायलाच मला जास्त आवडायचं. एका टोकाशी निमुळत्या होत गेलेल्या त्या काड्यांना जपान्यांनी मनोहर रंगांनी आणि नाजूक नक्षीने सजवलं आणि माझ्यासारख्या कलेच्या भोक्त्यांची पंचाईत करुन ठेवली. बहुतेक वेळेस लाकडी किंवा बांबूपासून बनलेल्या चॉपस्टिक्सच पाहण्यात आल्या पण हस्तिदंत आणि सोने-चांदी आदी धातूंपासूनही ’रॉयल’ चॉपस्टिक्स बनतात असं ऐकलं! जपान सोडताना ही चॉपस्टिकची जोडी विकत घेऊ का ती घेऊ यावर १००येन दुकानात मी एक अख्खी दुपार घालवली होती.

जपान्यांचं हे आवडतं फास्टफूड सामान्य उपहारगृहांपासून ते महागड्या रेस्टॉरंट्सपर्यंत सर्वत्र उपलब्ध आहे. कुठेही असलं तरी दर्शनी भागात त्या त्या डिशेसचे नमुने सुंदररीत्या मांडून ठेवलेले दिसतील. आधीच जपानी खाद्यप्रकार डोळ्यांना अतिशय सुखावतात इतकी सुंदर त्यांची रंगसंगती, सजावट असते. मग त्याभोवती अशी काही सुंदर पुष्परचना किंवा तत्सम सुशोभिकरण करतील की अरसिकातला शिरोमणीसुद्धा दोन क्षण तिथे थबकेल! यथावकाश ग्राहक आत शिरतो आणि खिसा हलका करुनच बाहेर पडतो. शिंजुकू भागात एका दुकानापुढे मी अशीच थबकले. प्रदर्शन पहावं त्याप्रकारे मी त्या देखाव्याचा पुरेपूर आनंद घेतला. ती संपूर्ण मांडणी आणि त्यातील एक एक नमुना अतिशय प्रेक्षणिय होता. लवकरच येऊ घातलेल्या पानगळीच्या थीमवर आधारीत त्या सजावटीत काय नव्हत? त्या लाकडी पार्श्वभूमीवर नाजूक केशरी मेपलच्या पानांच्या डहाळ्या..त्याला साजेशी प्रकाशयोजना...वाडग्यांमध्ये आणि काचेच्या चिमुकल्या वाट्यांमधले ते रंगीतसंगीत खाद्य, साके किंवा वाईनच्या आकर्षक बाटल्या आणि या सर्वांना साजेशी अशी दिसणारी जपानी चित्रलिपी!! वाह! क्या बात है! (फक्त एकच न शोभणारी गोष्ट तिथे होती...पदार्थांच्या किंमती! काहीच्या काहीच.....!)

सोबा गरम किंवा गार दोन्ही प्रकारे खाल्ल्या जातात. उन्हाळ्यात गारेगार सोबा जपानी सॉसबरोबर दिल्या जातात (एका बांबूच्या चाळणीवजा ट्रेवर वाढून आणलेल्या या सोबा प्रकाराला ’झारु-सोबा’ म्हणतात) तर थंडीत गरम गरम सोबा ब्रॉथमधून समोर येतात ज्याला नूडल सूपही म्हणता येईल. त्यावर मग मनपसंत टॉपिंग निवडून घातलं की झालं. ही टॉपिंग्ज बर्‍याचदां कच्ची आणि कदाचित त्या ऋतूला अनुसरुन असतात. (भोजनातल्या पदार्थांची आणि सजावटीचीही सांगड चालू ऋतूशी घालणं हे जपानमध्ये परंपरागत आहे. ’काईसेकी’ नावाच्या पारंपारीक भोजनात हे आवर्जून पाळतातच तर आजही या सोबा आणि उदोनपासून बनणार्‍या डिशेसमध्येही शक्यतो अशी सांगड घालण्याचा त्यांचा कल दिसतो. ) याखेरीज पदार्थाला ’फिनिशंग टच’ देताना बहुतेक वेळेस ’नोरी’ नावाच्या समुद्री शेवाळाचा (सीवीड) उपयोग करतात जो खाणं एक अशक्य प्रकार आहे. मी शाकाहारी उदोन सॅलड खाल्लं जे थंडगार उदोन नूडल्स, काही भाज्या घालून बनवलं होतं त्यात वरुन ती नोरी घालताना मी त्या मुलीला ज्याप्रकारे थांबवलंय तो तिच्यासाठी एक चिरंतन अनुभव असणार. तिने डोळे शक्यतेव्हढे मोठे करुन आश्चर्य व्यक्त केलं आणि मी इकडे (मनात) हुश्श्य केलं! नोरीसारख्या इतरही अशक्य गोष्टीं ज्या जपानी खाद्यात सढळ वापरतात आणि जपानी लोक सहज खातात अशांची ओळख हळूहळू होऊ लागली होती. ’नोरी’ ने शुभारंभ(!) झाला होता.

ऑफिसमध्ये एकदा लंचच्या वेळेस मी पाहिलं तर प्रत्येकजण जेवणाच्या ट्रेसोबत एकेक अंडंसुद्धा घेऊन येत होता. आता जेवणात अश्या कच्च्या अंड्याचं प्रयोजन काय हा प्रश्न मला पडेपर्यंत किमुरा-सान१ म्हणजे आमचा एक जपानी सहकारी समोर येऊन बसला आणि टाककन त्याने ते अंडं फोडून त्याच्या ट्रेमधल्या उदोनच्या डिशवर रीतं केलं आणि जपानात नव्यानं दाखल झालेली मी जेवण विसरले! कच्चं अंड खाणारी व्यक्ती मी प्रथमच पहात होते. :) नंतर त्या डिशचं नाव समजलं. ’सुतामिना उदोन’. म्हणजे ’स्टॅमिना (stamina) उदोन’! कच्च्या अंड्याने स्टॅमिना वाढतो की काय?! (बाकी ’स्टॅमिना उदोन’ने स्टॅमिना खरोखरीच वाढतो की नाही कुणास ठाऊक पण जपान्यांच्या सुंदर त्वचेचं, सुरेख काळ्याभोर केसांचं आणि एकंदरीत चिरतरुण दिसण्याचं रहस्य त्यांच्या आहारातच असलं पाहिजे. तेलाचा आणि मसाल्यांचा कमीतकमी वापर आणि कच्च्या भाज्यांपासून ते कच्ची अंडी, मासे आणि मांसवर्गाचाही समावेश आहारात असल्यावर काय बिशाद तुम्हाला कोणी चाळीशीचं म्हणेल! :)))

चिनीजपानी लोक ’काहीही’ म्हणजे ’का--ही--ही’ खातात हे लहानपणापासून ऐकलेलं. आपल्याकडच्या भल्या भल्या सामिष खवय्यांचीसुद्धा जिथे पंचाईत होते अशा जपानात प्रत्यक्ष राहिल्यावर (आणि पाहिल्यावर) त्याची खात्री पटली. (जपानी हे असे तर चिनी कसे हा एक अचंबित करणार प्रश्न आता मला पडलाय!) आता एखादं खाद्य अतर्क्य, अचाट, अशक्य असायला ते मानवाच्या खाण्यात विशेष प्रचलित नसलेल्या एखाद्या प्राण्याचं मांसच असलं पाहिजे असं काही नाहीये हा साक्षात्कार मला याच भूमीत झाला. तसाच शाकाहारात मी काहीही खाऊ शकेन हा माझा विश्वासही इथेच मोडीत निघाला. जरी एकप्रकारचा नकोनकोसा वास येतो तरी एकवेळ नोरी परवडली पण ’नात्तो’ हा प्रकार तर त्रिवार अशक्य, अचाट, अतर्क्य आहे. ’नात्तो’ ला मराठीत ’आंबवलेले सोयाबीन्स’ म्हणता येईल. (खरं तर ’कुजवलेले’च वाटतात ते!) छोट्या आकाराचे सोयाबीन्स पाण्यात भिजत घालून, मग उकडून ते एका विशिष्ट जीवाणूंमध्ये (बॅक्टेरिया) मिसळतात आणि हे प्रकरण एक दिवस आंबवायला ठेवतात.ते जीवाणू सोयाबीन्स खूप आंबवतात आणि मग फ्रीजमध्ये एका विशिष्ट तापमानात आठवडाभर हे मिश्रण ठेवून देतात जेणेकरुन या प्रकारात ते सोयाबीन्स चिकट होऊन त्यांना असंख्य तारा सुटाव्यात! झालं, नात्तो तय्यार!

आत्ता हे लिहितानासुद्धा पोटात ढवळून येत आहे. अत्यंत उग्र वासामुळे आणि खूप चिकट, तारा सुटलेलं असं त्याचं दृष्यस्वरुप पाहून मळमळून येणारे बिगरजपानी लोक तुम्हाला जपानात चिक्कार आढळतील. पण जपानी प्रजेत हे एक लोकप्रिय टॉपिंग आहे (विशेषत: तोक्योत) आणि खासकरुन भातावर किंवा सोबा/उदोनच्या डिशेसवर वरुन नात्तोचा एक गोळा टाकतात!

तशी जपानी खाद्याशी पहिली गाठ भारतातच पडली होती. जपानी भाषेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांसाठी तत्कालिन कॉन्स्युलेट जनरल श्री. काकू (हे एक जपानी आडनाव आहे)- यांच्या सौंनी एक डिनरपार्टी आयोजित केली होती. ’काकू’काका तेव्हा उपस्थित नव्हते मात्र ’काकू’काकू स्वत: जातीने हवं-नको ते बघत होत्या पण तरीही कॉन्स्युलेटच्या त्या उच्च वातावरणात खाण्याकडे फारसं लक्ष गेलं नव्हतं. आणि घशाखाली जे ढकललं होतं ते फार संस्मरणीयही नसावं कारण घरी येऊन जेवल्याचं मला आठवतंय! असं असलं तरीही जपानमध्ये असताना एकदा तरी जपानी पारंपारीक घरात (त्याला ’र्‍योकान’म्हणतात) राहून पारंपारिक पध्दतीने जेवण घ्यायचा मानस होताच माझा पण ती संधी इतक्या लवकर चालून येईल असं वाटलं नव्हतं. जपानमध्ये पाऊल ठेवल्याच्या लगेचच्या वीकएन्डला ऑफिसने पिकनिक जाहीर केली. एक रात्र मुक्कामाची ती पिकनिक यामानाशी नावाच्या प्रांतात आयोजित केली होती. यामानाशी हे वायनरीज (इथली द्राक्षे, पीच इ. फळे सबंध जपानात अव्वल दर्जाची समजली जातात) आणि ओनसेन म्हणजे गरम पाण्याचे झरे यासाठी प्रसिद्ध आहे. जितके ओनसेन जास्त तितकीच र्‍योकानही मुबलक असं एक ढोबळ टूरिस्ट कोष्टक जपानात रुढ आहे त्यामुळे यामानाशीमध्येही र्‍योकान पुष्कळ आहेत. साहजिकच आमचीही सोय एका पारंपारीक ’र्‍योकान-इन’मध्ये केली होती. दिवसभर या वायनरीतून त्या वायनरीकडे, मध्येच बदल म्हणून पीच फ्रूट पिकींग वगैरे करुन शेवटी र्‍योकानमध्ये टेकायला आलो. एकप्रकारची निबीड शांतता जाणवली तिथे आणि त्या र्‍योकानला बिलगून असलेला बांबूच्या चटयांचा आणि लाकडाचा वास नाकात शिरला. (आत्ता या क्षणीही र्‍योकानविषयी लिहिताना तोच गंध नाकाशी रुंजी घालतोय!)

प्रशस्त रुम, जमिनीवर अंथरलेल्या तातामी म्हणजे बांबूच्या चटया आणि सरकणारे चौकटी-चौकटींचे लाकडी दरवाजे, मंद प्रकाशाचे कंदीलसदृश्य दिवे पाहून मला मी लहानपणी पहायचे ती डीडीवर लागणारी जपानी सिरीयल ’ओशीन’ आठवली! हुबेहुब तोच देखावा फक्त किमोनोतल्या ललनांची कमी जाणवली ती लगेचच जेवणाच्या वेळेस भरुन निघालेली दिसली. जपानी पारंपारीक भोजनात दहापैकी आठ पदार्थ सामिष असण्याची शक्यता होती त्यामुळे. जेवणाचे काय दिवे लागणारेत याची अंधुकशी कल्पना आली. माझ्यासाठी शाकाहारी भोजन आगाऊ सूचना देऊन उपलब्ध करवलं होतं. (जपान सोडेपर्यंत माझ्या या आगाऊपणाला इलाज नव्हता!.) पण संध्याकाळच्या त्या भोजनाचा आस्वाद पोटात जागा नसल्याने आणि खूप दमल्याने नीट घेता आला नाही. परिणामी, जपानी खाद्याचा आस्वादाबरोबरच मनाजोगतं निरीक्षण करायला दुसरा दिवस उजाडावा लागला..

हे पारंपारिक जपानी जेवण साधसुधं नाही बरं! त्याला स्वत:चं असं एक स्पेशल नाव आहे आणि एक स्वतंत्र स्टाईलही! ’काईसेकी’ म्हणतात त्याला. आता ’काईसेकी’ हा शब्दसुद्धा जपानीत दोन प्रकारे लिहितात आणि दोन्हींचे अर्थ अर्थातच वेगवेगळे आहेत. ’懐石’या अक्षरांनी बनलेल्या काईसेकीचा उगम साधारण १५व्या किंवा १६व्या शतकात झेन भिक्षू त्यांच्या पोशाखाच्या पोटाजवळच्या घडीमध्ये गरम दगड ठेवत असण्याच्या गोष्टीत आहे.. त्या उष्णतेने प्रार्थनेच्या काळात भूक लागण्यापासून त्यांचा बचाव होत असे. या गोष्टीशी निगडीत असणार्‍या व चहापानासोबत दिल्या जाणार्‍या साध्या, हलक्या शाकाहारी अन्नास काईसेकी म्हणतात. तर ’会席’या अक्षरांनी लिहिलेल्या काईसेकी शब्दाचा अर्थ आहे मित्रमंडळींची भेटगाठ किंवा स्नेहसंमेलनानिमित्त केलेले भोजन. जपानमध्ये अजूनही या दोन्ही लिहिण्याच्या पद्धती प्रचलित आहेत. (किमुरा-सानने जेव्हा हे आम्हाला सांगितलं तेव्हा काईसेकीमध्ये मुळात शाकाहारी पदार्थ असत यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं!)

खरं तर काईसेकी ही एक स्वतंत्र कलाच आहे. त्यात निव्वळ अन्नग्रहण हीच एक बाब नसून इतरही अनेक गोष्टी गुंफलेल्या दिसून येतात...पण कशाचीही ओढूनताणून मुद्दाम सांगड घातलीय असं अजिबात वाटत नाही. काईसेकीमध्ये पदार्थाच्या चवीबरोबरच त्यांचा पोत, रंगसंगती आणि बाह्यस्वरुप या बाबींनाही विशेष स्थान आहे. इतकंच काय पण पदार्थांच्या त्या चिमुकल्या वाट्या, वाडगे, चॉपस्टिक्स आदी टेबलवेअरचीसुद्धा रंगसंगती पूरक असते. पण याचबरोबर महत्त्वाचा ठरतो तो ऋतू! बर्‍याचदा काईसेकीमध्ये त्यावेळेस असणारा चालू ऋतू हा ’थीम’ म्हणून वापरला जातो. मग त्याबरोबर साहजिकच त्या ऋतूत मिळणार्‍या सर्व नैसर्गिक चिजांचा वापर काईसेकीमध्ये केला जातो. त्या ऋतूत मिळाणार्‍या भाज्या, फळे, कंदमुळे पासून काही विशेष मत्स्यप्रकार किंवा इतर जलचर इ. पासून पदार्थ बनवले जातात. तेही ताजे. (जपानमध्ये एकंदरीतच पदार्थ ताजे असण्याला फार महत्त्व आहे. याची अतिशयोक्ती म्हणजे ’इकेझुकुरी’. त्याविषयी पुढे बघूया) तर या काईसेकीतील पदार्थ, सजावट, टेबलवेअर आदी गोष्टी केवळ ऋतुनुसारच नाही तर प्रांतानुसारही बदलतात. चिनी मातीच्या सुरेख वाडग्यांमध्ये, चिमुकल्या वाट्यांमध्ये जपानी पदार्थ सजून येतात तेव्हा खरंच त्या पानावरुन नजर हटत नाही. अगदी चॉपस्टिक्स ठेवायलाही ’हाशी-ओकी’ नावाच्या चिनी मातीच्या पिटुकल्या खोबण्या मिळतात (chopsticks rests) ज्यावर चॉपस्टिक्स ठेवणे अपेक्षित असते त्यासुद्धा इतक्या नाजूक असतात की बस! भोवती कधीकधी पानाफुलांची सजावटही असते. भले जपानी पदार्थ आपल्या जीभेला रुचणार नाही्त कदाचित पण सादरीकरण इतकं झकास असल्यावर क्षणभर चवींचा विसर पडतोच.! त्यादिवशी खाल्लेला भाज्यांचा तेंपूरा हा पदार्थ स्मरणात राहिला आहे. वांगी, जपानी मुळा वगैरे भाज्यांची ती चक्क आपल्यासारखी भजी होती! अर्थात आवरण बेसनाचं नसलं तरी एकंदरीत प्रकरण चांगलं लागतं.

बरं आता यजमानांनी तुमची एव्हढी चांगली बडदास्त ठेवलीय म्हटल्यावर तुम्हीसुद्धा चार (?) जपानी शिष्टाचार पाळावेत ही किमान अपेक्षा नसली तरच नवल! सर्वपथम म्हणजे काईसेकी हा घाईघाईत तोंडात कोंबायचा प्रकार नव्हे. यासाठी भरपूर वेळ काढला तरच एकामागोमाग एक प्रकट होणार्‍या त्या कोर्सेसची मजा घेता येईल. पानावर बसलायत? थांबा! अशी लगेच सुरुवात करु नका. तिथे हात पुसायला ’ओ-शिबोरी’ नावाचा टॉवेल देतील त्याने ’फक्त हातच’ पुसा. त्याच टॉवेलने चेहेरा, मान वगैरे पुसणे जपानी शिष्टाचारात बसत नाही. मग सुरुवात करण्याआधी ’इतादाकीमास२!’ असं म्हणून तुमच्यासाठी जेवण बनवण्यात गुंतलेल्या सर्व हातांचे आभार माना. अहो, तो सॉय सॉस असा भातावर किंवा सुशी-साशिमीवर एकदम ओतू नका. त्यासाठी ती छोटुकली ताटली दिलीय त्यात सॉय सॉस वाढून घ्या. आणि थोडासाच बरं! नाहीतर घ्याल रपारप...
त्या चॉपस्टिक्सच्या काड्या वापरायचे तर बरेच अलिखित नियम आहेत हं! त्या कश्या वापरायच्या हे शिकला असाल तर उत्तमच नाहीतर विनंती केल्यावर काटेचमचे तुम्हाला मिळू शकतील. तुम्हाला एखादा प्रकार दुसर्‍याला द्यायचाय? मग तो तुमच्या चॉपस्टिक्सनी तसाच दुसर्‍याच्या चॉपस्टिक्समध्ये देऊ नका तर एका स्वतंत्र बशीत वाढून घेऊन मगच त्याला द्या. तसंच तुमच्या चॉपस्टिक्स अश्या भाताच्या वाडग्यामध्ये उभ्या खोचू नका हं! अन्यथा तुमचे हे कृत्य एका भलत्याच प्रसंगाची आठवण करुन देईल! (मरणोत्तर क्रियाकर्माच्या वेळी उदबत्त्या वाळूमध्ये अशाच खोचून ठेवतात जपानी लोक!) खाऊन झालं? थांबा! त्या चॉपस्टिक्स नुसत्याच अश्या खाली ठेवू नका बरं. त्यासाठी ती चिमुकली खोबणी दिलीय ना (chopstick rest) त्यावरच ठेवायच्या चॉपस्टिक्स!
काय म्हणता, हे सर्व लक्षात ठेवणं कठीण आहे? अहो ते तर आहेच. पण जाताजाता एक शेवटची गोष्ट सांगते. भोजनसमाप्तीच्या वेळेस असे झटकन पानावरुन उठू नका तर ’गोचिसोsसामा देशिता३’ असं म्हणून यजमानांचे आभार माना. :)

ऐकून दम लागला म्हणताय? ठिक आहे, आता तुम्ही ’हुश्श्य’ करायला हरकत नाही! :)

कोणे एके काळी चक्क शाकाहारी पदार्थ असणार्या काईसेकीमध्ये आता मात्र सुशी, साशिमी आदी जपानी सामिष प्रकार आवर्जून असतात. वर सांगितल्यानुसार खरं तर काईसेकीतील खाद्यप्रकार जगप्रसिद्ध जपानी चहापानसमारंभात चहाच्या जोडीला देण्यात येणारे खाद्यविशेष असले तरी आता काईसेकी अनेक कोर्सेसचं स्वतंत्र भोजन म्हणून उपलब्ध असते आणि आलेल्या पाहुण्यांचा विशेष पाहुणचार करायचा असेल तर काईसेकी भोजन उपलब्ध असणार्‍या रेस्टॉरंट किंवा र्‍योकानमध्ये पाहुण्यास नेणे हे अतिथ्यशील जपानमध्ये लोकप्रिय आहे!

यामानाशीहून परत आल्यावर एका जादुई दुनियेतून परत आल्यासारखं वाटलं. रुटीन चालू झालं. काही दिवसांनी घराजवळच्या नेपाळी आणि पाकिस्तानी अश्या दोन रेस्टॉरंट्सचा शोध लागला. नेपाळी हॉटेलातली माझी व्यथा कुठल्याही जपानी हॉटेलात असते तशीच होईल की काय अशी मला भिती होती. पण मेनूकार्डावर ’मान्गो राश्शीs’ (मॅन्गो लस्सी)पाहून शंका मिटली. विनंती केल्यावर तो नेपाळी माझ्यासाठी सुरेख व्हेजिटेबल हक्का नूडल्स बनवून द्यायचा. (त्याच्या हॉटेलमध्ये एका टेबलवर एक वैशिष्ट्यपूर्ण टेबललॅम्प होता. त्याविषयी सांगायचा मोह आवरत नाही...एक फुलपाखरु दोन्ही पंख पूर्ण पसरुन विसावलंय...पंख रंगीबेरंगी, खूप नाजूक नक्षीचे, पातळ कागदाचे आहेत...फुलपाखराच्या मधल्या शरीराच्या भागात बल्ब बसवलेत. स्वीच ऑन केला की तो प्रकाश पंखामध्ये झिरपतो आणि ते सुंदर पंख उजळून निघतात! बांबू आणि कागदकामाचा तो एक अलौकिक नमुना होता. तो दिवा कुठे मिळू शकेल अशी मी त्याच्याकडॆ विचारणाही केली होती. त्याला नीटसं आठवत नव्हतं पण कुठल्यातरी एका खेड्यातली ती स्थानिक कारागिरी होती. त्यामुळे तसला दिवा खरेदी करण्याची संधी हुकली.)

दरम्यानं तोक्योतल्या माझ्या एका मैत्रिणीच्या घरी जाणं झालं तेव्हा तिने विचारलं, "ओकोनोमियाकी खाल्लीयस का?" मी नकारार्थी मान डोलावली. यावर तिने तो शाकाहारी व्यक्तिंसाठी एक चांगला पर्याय असल्याचं सांगितलं तेव्हा तो प्रकार खाऊन पहायचाच असं ठरवून टाकलं. दुर्दैवाने तिच्याबरोबर ’ओकोनोमियाकी’ला जाणं झालं नाही पण पुढे की आसाकुसाला देऊळ बघायला गेले तेव्हा मी ती संधी साधली.

आता ’ओ-कोनोमी-याकी’ म्हणजे काय? शब्दश: भाषांतर केलं तर ’ओ-कोनोमि म्हणजे ’तुम्हाला आवडेल ते’ आणि ’याकी’ म्हणजे ’शिजवलेले, ग्रील केलेले’...आपण ’रांधलेले’ म्हणूया...थोडक्यात ही ’आपली आवड’ आहे! नाव तर मजेदार वाटलं. तसाच मजेदार तो खाद्यप्रकारही आहे. स्पष्टच सांगायचं तर ’ओकोनोमीयाकी’ म्हणजे ’जपानी पिझ्झा’ किंवा आपलं जाडसर ’धिरडं’ चक्क. ओकोनोमियाकी तुम्हाला बनवून देतात किंवा तुम्ही स्वहस्ते बनवायची. पदार्थाचा बेस ठरलेला आहे. बहुतेक वेळेस गव्हाचं पीठ, पाणी किंवा ’दाशी’ नावाचा जपानी ब्रॉथ, अंडी, किसलेला कोबी किंवा ’याम’ नावाचं रताळ्या किंवा अळकुड्यासदृश्य जपानी/चिनी कंदासारखी भाजी वगैरेपासून मिश्रण बनवतात. मग त्यात ’आपल्या आवडी’नुसार कुठलंही मांस, मासे, भाज्या वगैरे घालून त्या मिश्रणाचे हातापेक्षा मोठे असे सांडगे तव्यावर घालतात आणि त्याची उलथापालथ करुन ते दोन्ही बाजूंनी पुरेसे खरपूस झाले आणि मग त्यावर जपानी मेयॉनीज वगैरे वगैरे सोपस्कार घालून झाले की तुम्ही खायला मोकळे.

बहुतेक वेळेस बेसवर बीफ, पोर्क, चिकन इ. चे पातळ स्लाईसेस वगैरे मांसाचे प्रकार किंवा प्रॉन्स, ट्यूना आदी मत्स्यविशेष (आणि हो, माझ्यासाठी ’अचाट’ असलेली आणखी एक सागरी खासियत घालतात यात. ऑक्टोपस!!!) याखेरीज मश्रूम्स, पातीचा कांदा, मक्याचे दाणे, ढोबळी मिरची इत्यादी प्रकार घातले जातात. सजावटीसाठी वरुन ’आओनोरी४’ नावाचं समुद्री शेवाळ, dried shrimps, ’बेनी शोsगा५’ नावाचं लोणचं (हे झकास लागतं) वगैरे घालून शेवटी मेयॉनीज किंवा ओकोनोमियाकी सॉस वरुन घालतात. यात (आमच्यासारख्यांच्या दृष्टीने) चांगला भाग हा की हे सर्व पदार्थ ऐच्छिक असल्याने तुम्ही हवं ते घालू शकता. त्यामुळे शाकाहारी ओकोनोमियाकीसुद्धा शक्य आहे. खरी गंमत तुम्ही स्वत:हून तुमची स्पेशल ओकोनोमियाकी बनवण्यात आहे. प्रत्येक टेबलवर एक स्टोव्ह आणि तवा ठेवलेला असतो. तुम्ही ऑर्डर दिलेल्या पदार्थांच्या मिश्रणाचा बोल तुम्हाला देतात. मग ते मिश्रण तव्यावर टाकून तुम्हीच तुमची ओकोनोमियाकी बनवायची आणि मस्त गप्पा मारत मटकवायची. तोक्योच्या थंडीत अजून काय पाहिजे!!

मुळात कानसाई (ओसाका) ची”स्पेश्यालिटी’ असलेली ओकोनोमियाकी आता सर्वत्र पसरली आहे. ओसाकाखेरीज हिरोशिमाची ओकोनोमियाकीही प्रसिद्ध आहे आणि तिथली पद्धतही थोडी वेगळी आहे. हिरोशिमात मूळ बेसवर इतर पदार्थांचे थर रचत जातात. यात सोबा किंवा उदोनचाही वापर करतात. हिरोशिमाची ओकोनोमियाकी जास्त चविष्ट असल्याचं मला ऑफिसमधल्या एका जपान्याने सांगितलं. (तो स्वत: मूळचा हिरोशिमा असल्याचं नंतर समजलं). ओकोनोमियाकीला एक भाऊसुद्धा आहे. तोक्यो आणि योकोहामात आढळणार्‍या या भावाचं नाव ’मोन्जायाकी’. प्रकरण ओकोनोमीयाकीसारखंच असतं फक्त मिश्रण खूपच पातळ असतं.

या दोहोंवरुन आठवलं ते ’निन्ग्योयाकी’. केवळ उच्चारात थोडंसं साधर्म्य असणारं ’निन्ग्योयाकी’ प्रत्यक्षात मात्र ओकोनोमि किंवा मोन्जायाकीहून पूर्ण वेगळं आहे. ’निन्ग्योयाकी’ हा एक जपानी गोड पदार्थ आहे. जपानमध्ये गोड पदार्थ साधारण दोन प्रकारात मोडतात. ’योगाशी’ (洋菓子) म्हणजे बिगर-जपानी, बहुतेक वेळेस पाश्चात्य गोड पदार्थ उदा. केक्स, पुडींग वगैरे आणि ’वागाशी’(和菓子) म्हणजे फक्त ’मेड इन जपान’म्हणजे असली जपानी गोड पदार्थ. यात ’आमानात्तो’(पहिल्यांदा हे नाव ऐकून मी घाबरले. कारण ’आमा’ म्हणजे जपानीत ’गोड’. म्हटलं हे ’गोड नात्तो’की काय?! पण नाही, हा एक पूर्ण वेगळा गोड पदार्थ आहे!), ’साकुरामोची’ (गोड भात आणि लाल रंगाच्या ’आझुकी’ नावाच्या बीन्सपासून बनलेला गोड पदार्थ. चेरीच्या पानात गुंडाळलेल्या या मिठाईला चेरीच्या फुलां(साकुरा)सारखा सुंदर गुलाबी रंग असतो) इ. प्रकार यात मोडतात. या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ म्हणजे ’निन्ग्योयाकी’. ’निन्ग्यो’ म्हणजे ’पपेट’. ’निन्ग्योयाकी’ हा जपानी आणि पाश्चात्य या दोन्हींचा मिलाफ असलेला गोड पदार्थ आहे कारण त्याचं वरचं आवरण स्पॉन्ज केकचं असतं आणि पोटात लाल ’आझुकी’ बीन्सची गोड पेस्ट असते. या मिठाईचा तोंडावळा हा मुख्यत्वे जपानी 'नशिबाच्या सात देवता’ (Seven Gods of Luck) किंवा माश्याच्या आकाराचा असतो. तोक्योतल्या आसाकुसा देवळाजवळ निन्ग्योयाकीची चिक्कार दुकानं आहेत. नुकत्याच केलेल्या ताज्या, गरम निन्ग्योयाकी खाण्याचा मोह आवरणं कठीण होऊन बसतं आणि त्यामुळे आपसूकच आधी पोटपूजा आणि मग देवपूजा असाच क्रम होऊन जातो!

ओकोनोमियाकीची चव जिभेवर रेंगाळत असतानाच प्रोजेक्टची शेवटची फेज लाईव्ह करायच्या निमित्ताने ऑफिसमधून क्यूशूला जायचा हुकूम आला. आतापर्यंत तोक्यो एके तोक्यो झाल्याने क्यूशूला जायला मी उत्सुक होते. यथावकाश तोक्यो-हानेदाहून जाल (JAL)चं विमान पकडून आम्ही दोनेक तासात जपानचं दक्षिण टोक असलेल्या क्यूशूतील कुमामोतो नावाच्या शहरातील विमानतळावर येऊन थडकलो.

तोपर्यंत क्यूशूबद्दल 'जपान हा चार बेटांपासून बनलेला देश आहे आणि क्यूशू हे त्यापैकीच एक बेट आहे याव्यतिरिक्त काहीच माहिती नव्हती. किमुरा-सान आमच्या आधीच कुमामोतोत दाखल झाला होता त्यामुळे तोच आम्हाला विमानतळावर न्यायला येणार होता. तो येईपर्यंत विमानतळावर एक जनरल चक्कर टाकली. चॉकलेट्स, इतर खाद्यपदार्थ, वस्तू वगैरेंची नेहेमीची दुकानं होती. विमानतळ छोटा असल्याने फारशी वर्दळ नव्हती. बर्‍याच दुकानात ’बासाशी’ असं लिहिलेले बोर्ड दिसत होते. हा काय प्रकार असावा काहीच उलगडा होईना. शेवटी ’बासाशी’ लिहिलेलं एक पाकीट मी जाऊन उचललं. पण तेव्हढ्यात किमुरा-सान आल्याचं बॉसने सांगितलं. त्यामुळे ते पॅकेट परत ठेवून दिलं तिथेच.नंतर किमुरा-सानने ’बासाशी’चा खुलासा केला. बासाशी म्हणजे फार काही नाही...तर घोड्याचं कच्चं मांस! Raw horse meat!! कुमामोतो, मात्सुमोतो, ओईता इ. शहरांची ही खासियत आहे! आता जपानी लोक काहीही खाऊ शकतात यावर माझं आधीच शिक्कामोर्तब झाल्याने मला फार काही आश्चर्य वाटलं नाही. पण माझ्या अचाट पदार्थांच्या लिस्टमध्ये भर मात्र पडली. कुतूहलही वाटलं.

हॉटेलवर पोचल्यावर रुममध्ये पाहिलं तर परत बासाशी हजर! हजर म्हणजे प्रत्यक्ष नाही तर इतर टुरिस्ट पुस्तिकांच्यासमवेत बासाशीची स्वतंत्र पुस्तिकाही तिथे ठेवली होती. त्यात बासाशी मिळणार्‍या ठिकाणांपासून ते बासाशीचा दर्जा, प्रत, किंमत असली माहिती दिली होती. ऑनलाईन ऑर्डर करायची असल्यास तीही सोय होती. एकंदरीत इथल्या पर्यटन पुरस्कृत करणार्‍या गोष्टींमध्ये बासाशीला महत्त्वाचं स्थान होतं तर! बासाशीलाच ’साकुरा’ असंही म्हणतात हे ऐकल्यावर मी बरोबर ऐकतेय ना याची परत विचारुन खात्री करुन घेतली. त्या मांसखंडांना चेरीच्या सुंदर आरस्पानी फुलांचंच नाव का बरं द्यावं? कारण काय तर म्हणे दोहोंतील रंगाचे साधर्म्य! दोन्ही गुलाबी! हे ऐकून मी कपाळावर हात मारला.
नंतर भरभरुन फुललेला क्यूशूचा चेरी बहर दिसला पण आता दरवेळेस ’साकुरा’ म्हटल्यावर बासाशीही आठवू लागली!

त्यानंतर बासाशीबद्दल चर्चा झाली ती आमच्या यजमानांनी ’श्रमपरिहारार्थ’ दिलेल्या भोजनसमारंभात. भोजनात अर्थातच बासाशीचा समावेश होता आणि त्यानिमित्ताने बासाशीचा विषय निघाला आणि ज्ञानात नवीन भर पडली. बासाशी ही एक प्रकारची साशिमीच आहे. आता साशिमी म्हणजे काय? तर साशिमी म्हणजे समुद्री जलचरांच्या मांसाचे काही सेमी जाडीचे स्लाईसेस. यात महत्त्वाचा भाग हा की हे मांस कच्चंच असतं! त्याचप्रमाणे ही बासाशी सुद्धा घोड्याच्या कच्च्या मांसाचे स्लाईसेस असतात. कधीकधी शिसो नावाच्या पानांमध्ये ते गुंडाळलेले दिसतात आणि सोबत कांदा, आल्याचं लोणचं, सोय सॉस देतात.
याहीपुढचा कळस म्हणजे बासाशी फ्लेवरचं आईस्क्रिमही मिळतं! आता बोला!!

आता विषय निघालाच आहे तर सुशी आणि साशिमीबद्दल थोडसं. खरं तर या दोन जपानी बहिणीच. पण बर्‍याचदां सुशी आणि साशिमीत गल्लत केली जाते. वर दिल्यानुसार साशिमी म्हणजे सीफूडचे नुसते कच्चे स्लाईसेस तर सुशीमध्ये जपानी भाताचा बेस असणार हे ठरलेलं. मग सुशीच्या प्रकारानुसार हा भात आणि नोरीच्या वळकट्या वळतात (भात चिकट असल्याने ते शक्य आहे) त्याला ’माकीझुशी’ किंवा ’नोरीझुशी’ म्हणतात किंवा त्या भाताचे हाताने गोळे वळतात त्याला ’निगिरीझुशी’ म्हणतात. या गोळ्यांमध्ये सीफूड/उमेबोशी६ नावाचं जपानी मुरवलेलं प्लम भरतात. (याव्यतिरिक्तही सुशीचे अनेक प्रकार आहेत) शिवाय वरुन वेगवेगळी टॉपिंग्जही असतातच. मासे, खेकडे, ऑक्टोपस इ. समुद्री जलचर, बीफ, पोर्क, बासाशी, सॉसेज इ. मांसवर्ग शिवाय काकडी, अवोकाडो, ऍस्परागस, याम, लोणच्यात मुरवलेल्या भाज्या, उमेबोशी, तोफू, अंडी इत्यादी असंख्य चिजांची टॉपिंग्ज वरुन सजतात. हे झालं सुशी. सुशी मला वाटतं आता इंटरनॅशनल फूड झालंय. आत्ता घरबसल्या आठवतेय तर इथे अमेरिकेत माझ्या गावात कमीत कमी तीन-चार तरी सुशी बार आहेतच.

जपानी भात हा ’जॅपोनिका’ नावाच्या जपानी तांदळापासून बनतो. या तांदळाचं शीत छोटं, जाड असतं आणि शिजवल्यावर चिकट होण्याचा असामान्य गुणधर्म या तांदळाला आहे. (त्यामुळे अथक प्रयत्न करुन सुद्धा फडफडीत भात खाण्याचं माझं स्वप्नं जपानमधे स्वप्नंच राहिलं!). भात हा जपान्यांना सोबा-उदोन इतकाच महत्त्वाचा पदार्थ आहे. नुसत्या तांदळाला ’कोमे’ म्हणतात तर शिजवलेल्या भाताला ’गोहान’ म्हणतात. जपानी शब्दश: तिन्हीत्रिकाळ भात खातात असं म्हटलं तरी वावगं ठरु नये कारण ’आसा-गोहान’ (सकाळची न्याहारी), ’हिरु-गोहान’ (दुपारचं जेवण) आणि ’बान-गोहान’ (संध्याकाळचं जेवण) या तिन्हींत गोहान आहेच! :) बरं नुसताच भात शिजवून गप्प बसले तर ते जपानी कसले! मग त्यातही त्यांनी बरेच प्रकार केले. ब्रेकफास्टचा एक सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे ’तामागो काके गोहान’. त्यात भातावर अंड फोडून (कच्चंच!) घालतात. सोबतीला नोरी असतेच. याशिवाय बार्ली घालून शिजवलेला ’मुगी गोहान’ नामक एक प्रकार आहे. पण मला सर्वात ’इंटरेष्टींग’ वाटलं ते ’ओनिगिरी’. एक प्रकारचा जपानी भाताचा सॅंडविच ज्याला म्हणता येईल त्या ’ओनिगिरी’ मध्ये भाताचे त्रिकोणी किंबा अंडाकृती गोळे वळतात. त्याला वरुन नोरी गुंडाळतात आणि पोटात उमेबोशी किंवा खारवलेलं सीफूड घालतात. हे ओनिगिरीचं ढोबळ वर्णन म्हणता येईल. प्रत्यक्षात जपानमधे प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीच्या ओनिगिरी आढळतात. अक्षरश: १०० प्रकार!७

मागे मी म्हटलं तसं पदार्थ हा ताजा बनवून वाढण्या/खाण्याला जपानी माणसाने बरंच महत्त्व दिलंय. जपानी असं म्हणतात की समुद्र आणि तुमची जेवणाची डिश, या दोघांमध्ये काही असावंच तर ते खानसाम्याचं त्याची आयुधं चालवण्याचं कौशल्य फक्त! पण या अतिशयोक्तीलाही काही सुमार असावा की नाही? याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'इकीझुकुरी' किंवा 'इकेझुकुरी' प्रकार. हीसुद्धा एकप्रकारची साशिमीच पण तीत तो प्राणी/जलचर जिवंत असतो! (जपानीत ’इकीझुकुरी” (生き作り) किंवा ’इकेझुकु्री” (活け造り) म्हणजे ’जिवंत (जलचरापासून) बनवलेला (खाद्यप्रकार)’ (Prepared alive!!!) तुम्हाला एव्हाना अंदाज आलाच असेल...टॅंकमध्ये पोहत असलेला तुम्हाला आवडेल तो कुठलाही जलचर तुम्ही निवडा... प्रमुख आचारी मग त्याची आयुधं त्यावर अशी काही परजेल की त्याने तो जलचर मृत होणार नाही पण तुम्ही तो खाऊ शकाल! ताटात असलेलं हालचाल करत असलेलं पूर्णब्रम्ह खायला कसं काय जमतं यांना कोण जाणे!!! याचं अनेक वर्षे ट्रेनिंग घेऊन त्यात तरबेज झालेले आचारीच हे करु शकतात. एक महागडं प्रकरण असलेलं इकीझुकुरी खुद्द जपानमधेही काहीजणांना खटकतं म्हणे......

जाता-जाता:
खरं म्हणजे अनंत प्रकारच्या मसाल्यांचे संस्कार झालेल्या आपल्या खाद्यपरंपरेपुढे ही जपानी खाद्यजंत्री जरा फिकी वाटली आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर जपानमध्ये असताना एकंदरीत त्यांची खाद्यसंस्कृती पाहून सुरुवातीस मला अनेकदा वाटलं होतं, ’ हे ’असले’ प्रकार कसं काय खाऊ शकतात हे लोक कुणास ठाऊक! पण नंतर असंही वाटलं की, फरक एव्हढाच आहे की त्यांना तेच आवडतं. मला नाही आवडत. Its just a matter of liking! आता आमचा सहकारी किमुरा-सानला भारतीय ’बटर चिकन’ फार म्हणजे फारच आवडतं. जपान्यांसाठी अंमळ ’मसालेदार’ असलं तरी हाश-हुश करत, घाम पुसत ’ओईशीs' (म्हणजे टेस्टी/स्वादिष्ट) म्हणत तो आडवा हात मारायचा चिकनवर. पण नंतर एकदा गप्पा मारताना त्याने कबूल केलं..’भारतीय डिशेस चांगल्या असतात पण मधूनच एकदा खायला आवडतात. रोज नाही आवडणार’. :) मला वाटतं आपल्या जिव्हाग्रंथी कुठल्या चवींना लहानपणापासून प्रतिसाद देत तयार होतात त्यावर बरचसं अवलंबून आहे.....
त्यानंतर सुशी, साशिमी पासून नात्तो, बासाशी आणि अगदी जपानी ग्रीन टी (’जॅपनीज ग्रीन टी’...किती गोंडस नाव आहे...हा प्रकार अगदी अचाट किंवा अतर्क्य वगैरे नसला तरी त्याची गोडी लागणं तितकसं सोपं नाही) या सगळ्यांकडे मी न्यूट्रल नजरेने बघायला लागले. (अर्थात, इकिझुकुरी सारखे प्रकार मात्र आजही माझ्या समजण्यापलिकडे आहेत...)

जपानला येण्यापूर्वी त्यांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल काही ठाम मत होती. वाटायचं, जपान्यांचे चेहेरे जसे अगम्य तशीच त्यांची खाद्यसंस्कृतीही असणार. आपल्याला तर त्यात काही गम्य नाही बुवा! पण ’जावे त्यांच्या वंशा’ ही म्हण अगदी सार्थ आहे! तिथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय गम्य वाटलं नाही हेच खरं. अर्थात बहुतेक वेळेस जरी माझ्यासाठी हे गम्य फक्त एक डोळ्यांना सुखावणार रम्य चित्र होतं तरी हेही नसे थोडके असंच मी मानते. जपानमधला रंगीत काळ पटकन निघूनही गेला आणि आता जगातल्या या चिमुकल्या देशातल्या एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीची झालेली ओळख (खरंतर झलकच) आणि त्यानिमित्ताने संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, अनुभव इ. गोष्टींची पदरात पडलेली शिल्लक तेव्हढी मागे राहिलीय..पण तीच खूप मोलाची वाटते मला.

एक जपानी म्हण आहे. ’नोकोरीमोनो नी फुकू गा आरु’ (残り物には福がある。) म्हणजे ’शिल्लक राहिलेल्यात नशीब असतं’. There is luck in the leftovers. (म्हणीमागची गोष्ट अशी आहे की घरी आणलेल्या मिठाईच्या बॉक्समधली सर्वात चांगली मिठाई घरातली मोठी भावंडे चटचट संपवून टाकतात. घरातल्या लहानग्याला मात्र ’उरलेली’अनाकर्षक मिठाई मिळते त्यामुळे हिरमुसलेल्या त्या शेंडेफळाची समजूत त्याची आजी काढते ’हिरमुसला होऊ नकोस बाळा! या शेवटच्या मिठाईतच तुझं नशिब असेल बघ.!’आणि मग खरोखर त्या शिल्लक राहिलेल्या मिठाईत दडलेली गंमत त्या छोटूला मिळते...

माझ्या बाबतीत मात्र मागे उरलेल्या माझ्या या अनुभवांच्या शिल्लकीत माझं नशीब असण्यापेक्षा नशिबाने मला ही शिल्लक मिळाली असंच मला वाटतं.

समाप्त.

१) -सान: Mr./Mrs/Ms किंवा श्री/सौ/कु. साठी जपानीत नावापुढे लावला जाणारा प्रत्यय

२) इतादाकीमास: जेवण सुरु करण्यापूर्वी म्हटला जाणारा ’(जेवायला) सुरुवात करते/करतो’ या अर्थाचा आभार मानणारा जपानी वाक्प्रचार

३) गोचिसोsसामा देशता: जेवण संपल्यावर म्हटला जाणारा ’छान होतं जेवण. धन्यवाद’ अश्या अर्थाचा आभार प्रदर्शित करणारा जपानी वाक्प्रचार

४) आओ-नोरी: ’आओनोरी’ म्हणजे ’हिरवं समुद्री शेवाळ’ (जपानी भाषेत ’आओ’ म्हणजे हिरवा/नीळा रंग, नोरी म्हणजे समुद्री शेवाळ)

५) बेनी शोsगा: जपानी पद्धतीचं आल्याच्या किसाचं लोणचं. हे लाल रंगाचं असतं.

६) उमेबोशी: 'उमे' म्हणजे जपानी प्लम. प्लमपेक्षा जर्दाळूच्या जवळ हे फळ जातं. आपल्या मिठातल्या आवळ्यांप्रमाणेच ही फळं मिठ घालून उन्हात वाळवतात. त्याला उमेबोशी म्हणतात.
[७] ओनिगिरीचे अक्षरश: १०० प्रकार http://www.komenet.jp/onigiri100/event/onigiri/index.html येथे पहावयास मिळतील. (प्रस्तुत लिंक जपानी भाषेत आहे)

(झारु-सोबा व ओनिगिरी फोटो सौजन्यः गौरी ओळकर-शेंबेकर)

(मायबोली.कॉम दिवाळी अंक २००८ येथे पूर्वप्रकाशित)

22 February 2008

"त्यांना म्हणावं बाकी काहीही चालेल, पण यात साके मात्र ठेऊ नका" माझ्या नवीन बॉसने मला सांगायला सांगितलं.मी तसं सांगितल्यावर योशिदा उमजून हसले...नेहेमीप्रमाणे एक सोनेरी दात आत लुकलुकला.

शेवटच्या दिवशी 'फेअरवेल' समारंभात योशिदा या जपानी सदगृहस्थाला आम्ही म्हणजे आमच्या देशी डिपार्टमेंटने आपल्या सत्यनारायणाच्या किंवा तत्सम पूजेत ठेवला जाणारा एक नक्षीदार चांदीचा कलश भेट म्हणून दिला होता. त्याचा 'सदुपयोग' व्हावा एव्हढ्याच कळकळीच्या इच्छेने माझ्या नवीन बॉसने त्याचा उपयोग योशिदांनी 'कसा' करु नये यावर तेव्ह्ढ्यात एक टिप्पणी मला त्यांच्यापर्यंत पोचवायला सांगितली होती. मी तो हुकुम पाळलाही.

नेहेमीप्रमाणे पाठोपाठ कॅंटिनमधल्या सामोश्यांचं ताट आणि बर्फीचा बॉक्स सर्वांमध्ये फिरला. आतापर्यंत भारतीय खाद्यपदार्थांना अत्यंत विनम्र नकार देणार्‍या योशिदांनी यावेळेस मात्र एक बर्फीचा छोटा तुकडा स्वीकारल्याचं मी पाहिलंच. माझ्या चेहेर्‍यावरचं आश्चर्य पाहून हसून त्यांनी औपचारिकपणे का होईना पण ती बर्फी स्वादिष्ट असल्याचं सांगितलं.

आजची त्यांची एकेक कृती कुठेतरी सांगून जात होती...हे सगळं आज शेवटचं आहे. उद्यापासून मी नसेन इथे.

म्हणजे? सकाळी आल्या आल्या जपानीत गुड मॉर्निंग मी कुणाला करू आता? आमच्या ऐसपैस डिपार्टमेंटच्या खिडकीजवळच्या कोपर्‍यातलं 'एल' आकाराचं टेबल आणि खुर्ची रिकामी असणारे आता उद्यापासून? ठीक नऊच्या ठोक्याला दररोज चालू हो्णार्‍या आणि उभ्याउभ्याच चालणार्‍या 'मॉर्निंग मिटिंगमध्ये' मी आज काय काम करणार आहे हे ऐकायला आता जपानी कान नसतील? सकाळी सकाळी पार पाडण्याचं '५ एस' नावाचं टापटीप-व्यवस्थितपणा अंगात मुरवणारं जपानी आन्हिक आता जपानी बारीक नजरेच्या अभावामुळे केवळ 'उरकून' टाकलं जाईल का?

'फेअरवेल' समारंभाच्या आड लपलेले एकेक प्रश्न आता माझ्या मनात हळूहळू भिनायला लागले...तसंतसं जाणवू लागलं...कुठेतरी खूप वाईट वाटतंय...हा ऋणानुबंध इथे संपल्याचं वाईट वाटतंय. आज यांचा इथला शेवटचा दिवस. आज रात्रीच ते जपानला परत जातील. उद्यापासून त्यांची उणीव भारी जाणवेल...
खरं तर बॉस हा नोकरदार मंडळींच्या आयुष्यातला एक अविभाज्य आणि न टाळता येण्यासारखा घटक. हा घटक बहुतेक वेळेस 'नकोनकोसा'च असतो...शनिवार-रविवार मस्त मजेत घालवल्यावर सोमवारी सकाळी ऑफिसात गेल्यावर अचानक 'आज बॉस येणार नाहीये' ही सुवार्ता अनपेक्षितपणे कानावर पडली तर ती सकाळ अगदी शुक्रवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळपेक्षा अधिक रमणीय का नाही वाटणार! वातावरण कसं आपसूकच सैल होतं.....:)

असो. तर या बॉस नामक घटकाशी सर्वांप्रमाणे माझीसुद्धा गाठ पडली...पण शेवटी ती सोडवताना भारी वाईट वाटलं....कारण ती व्यक्तिच तशी होती.माझ्यासाठी त्या व्यक्तीने 'बॉस' ही दोन अक्षरं कधीच ओलांडली होती..ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते नव्हे, अजून आहेत.

मी अर्थशास्त्राची द्विपदवीधर (चुकुन!) झाले खरी पण जीव रमला होता जपानी भाषेत. जपानी 'येत' असल्याचा पुरावा दाखवणारे दोन कागदही गाठीशी जमले होते तोपर्यंत. तर अचानक कळलं की एका मोठ्ठ्या जपानी कंपनीत जपानी जाणणारी व्यक्ति पाहिजे. कंपनीचं नाव आणि पत्त्याव्यतिरिक्त फारसं काहिही ठाऊक नसताना सरळ तिकडे अर्ज ठोकून दिला. (आता आठवलं की हसू येतं..पण तेव्हाचा माझा अर्ज हा अत्यंत बाळबोध स्टाईलचा, हाताने लिहिलेला होता आणि वर बायो-डाटा असं मोठ्ठ्याने लिहिलेलं होतं! :) आताच्या लेसर प्रिंट केलेल्या, प्रचलित फॉर्मॅटमध्ये लिहिलेल्या, 'प्रोफेशनल सीव्ही'च्या पुढे तो म्हणजे एखाद्या आधुनिक तरुणीपुढे एखादं गावरान ध्यान जणू! :))) असो. विषयांतर झालं!) तर म्हटलं बघूया निदान बोलावणं तरी येतंय का. गंमत म्हणजे त्यांचा फोन आला मुलाखतीसाठी. आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू असल्याने आनंद आणि भिती या संमिश्र भावनांनी सरळ ठरवलं जाऊन तर येउ....फार फार तर काय होईल.. निरोपाचा नारळ मिळेल...पण मुलाखत म्हणजे काय करतात ते तर कळेल..न जाणो पुढे किती ठिकाणी मुलाखती देत फिरावं लागणार आहे...जरा सवय तरी होईल.

तोपर्यंत इकडे तिकडे चौकशी केल्यावर कळलं की ती एक जपानी बहुराष्ट्रीय इंजिनियरींग कंपनी आहे..भारतात त्यानी हल्लीच काही वर्षांपूर्वी प्लांट टाकलाय आणि ही कंपनी कसलीतरी मशिन्स बनवते. एवढी माहिती कळेस्तोवर मुलाखतीचा दिवस उजाडलाही. ठरलेल्या वेळेच्या आधीच पोचले. मी एकटीच होते तिथे. अजून कोणी उमेदवार आलेला दिसत नव्हता. बाहेर लॉबीत बसून आत कधी बोलावतायत याची वाट पहात असतानाच दोन-तीन जपानी इकडून तिकडे गेले. थोड्यावेळाने अजून एक तिसराही दिसला (की एकच जपानी तीन वेळा तिकडून गेला होता की काय कुणास ठाऊक) आणि लक्षात आलं की हे सर्व सारखेच दिसतायत आणि चेहेर्‍यांप्रमाणेच त्यांचा पोशाखही सारखा आहे...ओह म्हणजे इथे युनिफोर्म आहे तर....अच्छा....बसल्याबसल्या माझं विचारचक्रं चालू झालं. इथे जपानी लोक किती आहेत कुणास ठाऊक....बरेच दिसतायत...म्हणजे....माझी मुलाखतही जपानी माणूसच घेणार वाटतं.....हं...बापरे...जपानी बोलता येतं तसं मला पण आतापर्यंत क्लासमध्ये सरांबरोबर किंवा इतर मैत्रिणींशी जपानी फाडलंय तेव्हढंच...खर्‍याखुर्‍या असली जपान्याशी कुठे बोललोय आपण कधी!.....समजा त्यांचे उच्चार मला कळलेच नाहीत तर....बोललेलं कळलंच नाही तर मी काय उत्तरं देणार!....अरे देवा काय होणार आहे कुणास ठाऊक....देवा....वाचव..

आता पाय थरथरायला लागले. तोंडातून शब्द फुटेल की नाही ही नवीन चिंता भेडसावू लागली. आधीच नाही म्हटलं तरी ते चकचकीत वातावरण अंगावर आलंच होतं. तेव्ह्ढ्यात रिसेप्शनिस्टने सांगितलं जा आत डावीकडील पहिली ट्रेनिंग रुम. धडधडत्या हृदयाने उठले. तो काचेचा जड दरवाजा लोटून आत गेले. डावीकडे पाहिलं..त्या ट्रेनिंग रुममधे त्या ऐसपैस टेबलवरचे कागद (माझा अर्ज) चाळणारा एकच जपानी दिसला. मी मग जपानीत अभिवादन केलं तसं त्या माणसानेही केलं. त्याचा उच्चार स्पष्ट होता..मला अगदी व्यवस्थित कळलं. टेन्शन एका टक्क्याने जरा कमी झालं.

'मी योशिदा.' त्या माणसाने त्याचं नाव सांगितलं. पाच फुटाच्या आसपास उंची, किंचीत पिकलेले केस, सोनेरी काडीचा चष्मा, लुकलुकणारे जपानी डोळे आणि चेहेर्‍यावर शांत भाव. मला थोडं हायसं वाटलं. माझी योशिदांशी झालेली ही पहिली भेट.

मग काय करतेस वगैरे बेसिक माहिती ते विचारु लागले. त्यांचे उच्चार सुस्पष्ट असल्याने मला समजण्यात काहीही अडचण आली नाही त्यामुळे संधीचा फायदा घेऊन जेव्ह्ढं येत होतं तेव्ह्ढं जपानी त्याच्यासमोर मनसोक्त फाडलं. इंप्रेशन पाडायला सोबत माझ्या जपानी लिपी गिरवलेल्या हस्ताक्षराच्या वह्या नेल्या होत्या...त्याही दाखवल्या. सुदैवाने माझं अक्षर (तेव्हा) चांगलं असल्याने ते त्यांना आवडलं आणि जपानी लिपीचा असाही सराव भारतात केला जातो हे पाहून त्यांना आनंद झाला. (माझा वह्या नेण्याचा हेतू सफल झाला. :)तेवढ्यात रुमचं दार लोटून एक चष्मा लावलेला उंच जपानी आत आला. त्यानेही त्याची ओळख करुन दिली 'मी या कंपनीचा डायरेक्टर'. त्याच्या हातात एक जपानीतला ईमेल होता. योशिदा म्हणाले, हा इमेल ट्रान्सलेट करुन देऊ शकशील का? पाहिलं तर टेक्निकल भाषेतला तो काही मजकूर होता..देवाचा धावा करत ते दिलं जमेल तसं ट्रान्सलेट करुन.

मुलाखत तिथेच आटोपली. मी नंतर कळवतो असं आश्वासन योशिदांनी दिलं. त्यांचे आभार मानून, नेलेला पसारा उचलून मी रुमच्या बाहेर आले. आता रिझल्ट काहीही लागो, आपल्याला जपानी माणसांशी जपानीत व्यवस्थित बोलता येतं हा आत्मविश्वास मात्र निर्माण झाला होता.मी केलेलं भाषांतर त्यांना रुचलं असावं कारण लगेचच काही दिवसांनी तिथून फोन आला. ऑफर लेटर आणि इतर डिस्कशनसाठी या. म्हटलं चला नोकरी तर मिळाली. आयुष्यातली पहिलीच.

पहिली नोकरी! त्यामुळे अप्रूपाची!! पॉकेटमनी पर्व संपलं आता...आता माझी स्वकमाई चालू होणार....कुठेतरी मनाला सुखद गुदगुल्या झाल्या.५ तारखेला पहिला दिवस होता. जपानी वक्तशीरपणा, शिस्त वगैरे लक्षात घेऊन चांगली अर्धा तास आधीच जाऊन पोचले. सकाळचा बहुतेक वेळ एच आरचे फॉर्म्स भरण्यात गेला. मग रिसेप्शनीस्टने मला माझ्या भावी डिपार्टमेंटमध्ये नेलं. योशिदांच्या पुढ्यात मला उभं करुन ती निघून गेली.

मी त्यांना जपानीत अभिवादन केलं. तसं त्यांनी त्यांच्या टेबलाच्या जवळ असणार्‍या एका क्यूबिकलमधली रिकामी जागा माझ्यासाठी असल्याचं सांगितलं आणि लागलीच एक तोशिबाचा लॅपटॉप आणून ठेवला. कामाचं स्वरुप वगैरे जेवणानंतर मला सांगणार होते. तेव्ह्ढ्यात बेल झाली. लंच टाईम!ही कंपनी एक टिपिकल 'फॅक्टरी' असल्याने इथे शाळेसारख्या बेल्स व्ह्यायच्या. तीन शिफ्ट्स, चहाकॉफी, लंचच्या वेळा वगैरे अधोरेखित करायला त्या होत असत. जोडीला युनिफॉर्मही होताच. एका शिक्षकाची कमी होती तीही योशिदांच्या रुपाने पूर्ण झाली होती.

पहिलीच नोकरी असल्याने कामाचा पूर्वानुभव नसण्याव्यतिरिक्त एखाद्या फ्रेशरमध्ये आढळणारा नवखेपणा, बुजरेपणा माझ्यात ठासून भरलेला होताच. त्यातच पुढ्यात लॅपटॉप ठेवून योशिदांनी माझ्या टेन्शनमध्ये भर घातली होती. मी कधीही लॅपटॉप त्यापूर्वी पाहिला नव्हता. नाही म्हणायला घरी कॉम्प्युटरचे नुकतेच आगमन झाले असल्याने इंटरनेटबद्दल थोडी ज्ञानप्राप्ती झाली होती पण ती तेव्हढीच. लॅपटॉप एव्ह्ढ्या जवळून प्रथमच पहात होते. घाबरत घाबरत तो ऑन केला. आणि जपानीतून ऑपरेटिंग सिस्टिम अवतीर्ण झाली. 'स्टार्ट' च्या जागी जपानीतलं 'सुताssतो' बघून आवंढा गिळला. हा जपानी लॅपटॉप कसा काय आपल्याला वापरायला जमणारे या विचाराने जीव घाबरा झाला. माझी उडालेली घाबरगुंडी जपानी नजरेतून सुटली नव्हतीच. त्यांनी हसून मला मिटिंगरुम मध्ये बोलावलं आणि पहिलंच वाक्य म्हणाले, "टेन्शन अजिबात घेऊ नकोस". इतकं हायसं वाटलं त्या उद्गारांनी!

त्यानंतर त्यांनी माझ्या कामाविषयी मला आढावा दिला. माझी कामं नीट समजाऊन दिली. मुख्य जबाबदारी जपानमधले हेडऑफिस आणि ही कंपनी यातलं आमच्या डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन सांभाळणे ही होती. साहजिकच तो संपर्क जपानी-इंग्लिश या दोन्ही भाषांमधू्न चालवायचा होता. पहिले काही दिवस योशिदांच्यासोबत बसून त्यांची सर्व कामे बघून ठेवायची असं ठरलं.

माझं ट्रेनिंग चालू झालं. पहिल्या फटक्यात त्यांच्या कामाच्या पद्धतीमधलं एक वैशिष्ट्य चटकन नजरेस पडलं. व्यवस्थितपणा! टेबलवर कुठेही कागदांची भेंडोळी पडल्येत, अनावश्यक पोस्ट-इट्स सर्वत्र चिकटल्यात, फाईलींमधून कागद बाहेर डोकावतायत, पेनपेन्सिली, मार्कर्स विखुरलेत असं चित्र कदापि दिसलं नाही. उत्तम क्वालिटीच्या जपानी फाईल्समध्ये कागद व्यवस्थित ठेवून वर त्या त्या संदर्भाचा जपानीत स्टिकर चिकटवलेला. मोठाली इंजिनियरींग ड्रॉईंग्ज व्यवस्थित घडी घालून फाईल केलेली. हाच प्रकार त्यांच्या लॅपटॉपमध्येही, 'माय डॉक्युमेंट्स'मध्ये विविध फोल्डर्स इतके व्यवस्थित नावं घालून तयार केलेले असत की एखादी फाईल कुठे सेव्ह केली आहे या शोधाशोधीत कधीही वेळ गेला नाही. त्या विषयाच्या फोल्डरमध्ये असणारच ती फाईल. वेगवेगळ्या फाईल्स चटकन डेस्कटॉपवरच सेव्ह करुन तो चित्रावून ठेवण्याची माझी सवय त्यामुळे चांगली मोडीत निघाली.

जपान आपल्या तीन-साडेतीन तास पुढे असल्याने त्यांनी सकाळी त्यांचा आऊटलूक मेलबॉक्स उघडला की त्यात जपानहून ढिगाने आलेले इमेल्स दिसायचे. ते सिनियर ऍडवायजर असल्याने ते सहाजिकच होतं. विषयानुसार त्यांची विभागणी करुन, अतिमहत्त्वाच्या इमेल्सवर ते त्वरीत काम चालू करत. त्यांच्या समवेत काम करताना 'आत्ता नको, नंतर बघू', 'उद्या केलं तरी चालेल' असल्या विचारांना काडीचाही थारा नसायचा.

जसजसे दिवस जात राहिले, तसतसा हळूहळू भारतीय आणि जपानी कामाची पद्धत आणि त्याहीपेक्षा विचारसरणीतच तफावत असल्याचं लक्षात येऊ लागलं. प्रामुख्याने या बाबी दुभाषी म्हणून काम करताना फार जाणवत. शॉपफ्लोअरवर मशिनच्या बाजूला उभं राहून योशिदा आणि भारतीय इंजिनियर किंवा टेक्निशियनसमवेत दुभाष्याची भूमिका बजावताना हे लक्षात येई. उदाहरणार्थ अमुक एका पार्टला पॉलिशींग करायचं आहे, तर त्या प्रोसेस संबधित सर्व माहिती म्हणजे कुठल्या प्रकारची, क्वालिटीची आयुधं, केमिकल्स वापरायची इथपासून पॉलिशिंगची पद्धत अगदी आकृत्यांसकट स्टेप बाय स्टेप वर्णन केलेली जपानी मॅन्युअल्स असत त्यानुसार'च' पॉलिशिंग केलं पाहिजे हा जपानी अट्टाहास आणि 'एखाददुसरी स्टेप नाही झाली, दुसर्‍या प्रकाराने पॉलिशिंग केलं तरी कुठे बिघडलं, काय फरक पडतो..' ही भारतीय विचारसरणी यात अनेकदा खटके उडालेले अनुभवले आहेत. या 'काय फरक पडतो' या वृत्तीचा असलेला अभाव हेच जपान्यांच्या यशामागच्या कारणांमधलं एक कारण असावं हे मत ठाम होऊ लागलं.
जपानी कामाची पद्धत हळूहळू ओळखीची होत असताना ती अधिकाअधिक मनावर बिंबली जाण्यामागे योशिदांनी मला त्याविषयी दिलेलं ज्ञान हे एक प्रमुख कारण होतं. 'अमुक एक पद्धत इथे आहे म्हणून ती तू पाळली पाहिजेस' असा कोरडा हुकुम देण्यापेक्षा ती पद्धत का आहे, त्याचं महत्त्व काय हे समजावणंही त्यांना गरजेचं वाटलं हे माझं भाग्य! सकाळी सकाळी कॉम्प्युटरही चालू करण्याआधी ठीक नऊच्या ठोक्याला सर्वांनी डिपार्टमेंटच्या मध्यभागी एकत्र जमून, उभ्याउभ्याच का होईना पण 'आज तुम्ही कोणतं काम करणार आहात' हे त्रोटक सांगितलं तरी चालेल पण ते सांगण्यासाठी केली जाणारी 'मॉर्निंग मिटिंग' हे शिक्षण त्यापैकीच एक. यामुळे सगळ्यांनाच एकंदरीत सर्वांची काय कामे आहेत याचा ढोबळ अंदाज येतो आणि मग त्या दिवसातली कामे आखायला त्याचा निश्चितच फायदा होतो. हे विशेषत: ज्यांची कामे एकमेकांच्या कामांवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी फार उपयोगी पडते. त्याचप्रमाणे 'फाईव्ह एस' आणि 'काईझेन' ही अशीच अजून दोन जपानी यशरहस्ये. आमच्या कंपनीत शॉपफ्लोअरपासून इतरही डिपार्टमेंट्स मध्ये ५एस आवर्जून पाळले जात असे. 'काईझेन' साठी शॉपफ्लोअरवर काईझेन बोर्डच उभे केलेले असत. शिवाय वार्षिक काईझेन अवॉर्डही असत. या सर्वांचं महत्त्व योशिदांनी समजाऊन सांगितलं होतं. कितीही मोठा जपानी साहेब असला तरी तो ही अन्हिके उरकताना दिसत असे. याला अपवाद अगदी एम.डी.सुद्धा नव्हते.

जपानी माणूस 'वर्कोहोलिक' म्हणून प्रसिद्ध आहे पण म्हणून मला तरी योशिदा कधीही काम करत उशीरापर्यंत बसले आहेत असं अपवादात्मक प्रसंग सोडल्यास आढळले नाहीत, सकाळी नऊ पासून साधारणपणे संध्याकाळी साडेसहा-सातपर्यंत ते ऑफिसमध्ये असत. इथे भारतात एकटे असल्याकारणाने (त्यांचं कुटुंब जपानमध्ये असल्याने), घरी लवकर जाऊन तरी काय करणार अश्या भावनेतूनही बहुतेक वेळ ऑफिसमध्ये घालवणार्‍यांपैकी ते नव्हते. कामाच्या वेळेत काम करुन ते घरी वेळेवर जाणारे ते एक सहृदय पिता होते. त्यांना तीन मुली होत्या. त्यांच्या बायकोचे आणि मुलींचे जपानमधले फोटो त्यांनी मला दाखवले होते. गोल्फची आवड असणारे योशिदा एक कुटुंबवत्सल गृहस्थ होते. खरं म्हणजे तीन वर्षांच्या डेप्युटेशनवर ते आले होते पण कधीही ते कंटाळलेत किंवा जपानच्या तुलनेत भारतात हवामानापासून खाद्यपदार्थ, वाहतुकीपर्यंत सर्वच बाबतीत प्रचंड फरक जाणवत असूनही कधीही त्यांच्याकडून हेटाळणीचा किंवा तक्रारीचा सूर ऐकला नव्हता. त्याच्याउलट एका तरुण जपानी टेक्निशियनचं वर्तन चांगलंच लक्षात राहिलंय. ते साहेब आले होते फक्त एका महिन्यासाठी पण आल्याआल्या सर्वात आधी त्याने भिंतीवर कॅलेंडर लावलं आणि जसजसा एकेक दिवस जाईल तसतसा तो त्यावर एक एक फुली मारत जाई. जशी काही अगदी काळ्या पाण्याची सजाच दिलीय त्याला कोणी! खाण्यापिण्यापासून, रस्ते, वाहतूक, हवा, गरीबी हे विषयही त्याने अनेकदा त्रासिक चेहेर्‍याने छेडले होते!

योशिदा स्वभावानेही खूप साधे होते आणि रागावता तर त्यांना मुळीच यायचं नाही.:) दुसर्‍याला लागेल असं अपमानास्पद बोलणं किंवा कामातही तश्या प्रकारची कडक भाषा ते कधीच वापरत नसत. याचा अर्थ ते चुका दाखवत नसत असं मुळीच नाही. कुठे चुकतंय हे अचूकपणे, संयमाने, तोल सुटू न देता दाखवण्याची त्यांची शाब्दिक आणि लेखनिक हातोटी विलक्षण होती. कंपनीत काही इतर जपानी अधिकारी, टेक्निशियन्स होते त्यांच्या भारतीयांच्या केवळ चुकाच हेरायच्या आणि वर त्या अक्षरश: ज्याला इंग्रजीत हार्श म्हणतात अश्या भाषेत मांडून ते खरडपट्टीवजा रीपोर्ट वरपर्यंत पोचवायचे यातच धन्यता मानणार्‍या स्वभावाच्या पार्श्वभूमीवर योशिदा खूप वेगळे वाटायचे. चांगलं काम केल्यावर एखाद्या टेक्निशियनच्या पाठीवर कौतुकाची थाप तर ते नेहेमी द्यायचे. अशी जपानी शाबासकी कोणाला नाही आवडणार! त्यामुळेच ते शॉपफ्लोअरवरही चांगलेच लोकप्रिय होते.

भाषांतरकार किंवा त्याहीपेक्षा दुभाषा म्हणून काम करताना वेगवेगळे अनुभव यायचे. कधीकधी आपलेच लोक मध्येच काहीतरी असंबद्ध बोलून विनोदनिर्मितीही करतात. एकदा एका भारतीय इंजिनियर आणि योशिदांसाठी दुभाषीगिरी करत असता त्या संभाषणात २ तास कसे गेले तेच कळलं नाही..शेवटी ती चर्चा संपत आली. दिवाळीचे दिवस होते आणि अचानक भारतीय इंजिनियरने मधेच एक मराठीत वाक्य टाकलं "त्यांना विचार, फटाके उडवले का त्यांनी" गंभीर टेक्निकल चर्चेच्या समारोपाच्या वाक्यांच्या जागी हे वाक्य ऐकून मला हसू लोटणार होतं पण मी स्वत:ला सावरलं. भाषेचा कितीही अडसर असला तरी माणसाचे चेहेर्‍यांवरील भाव सर्वत्र सारखेच असतात. मी दाबलेलं हसू आणि त्या भारतीय इंजिनियरच्या चेहेर्‍यावरचे भाव योशिदांच्या नजरेतून काही सुटले नाहीत आणि लागलीच त्यांनी विचारलं 'काय झालं'. मी काय ते सांगितल्यावर मिस्किलपणे तेही हसले. भाषेचा अडसर होता म्हणून की काय पण 'फेस रीडींग' त्यांना चांगलं जमायचं. ते जपानला सुटीवर जाऊन आले की येताना न चुकता सर्वांसाठी काहीतरी ओमियागे (छोटीशी भेटवस्तू) किंवा जपानी स्नॅक्स/मिठाई घेऊन यायचे. जपानी चव न झेपणारे माझ्यासारखे खूपजण डिपार्टमेंटमध्ये होते. पण म्हणून काय झालं, तोंडदेखलं का होईना पण ती मिठाई स्वीकार करावी आणि हसतमुखाने आभार मानावेत ना! पण आमच्या डिपार्ट्मेंटमधल्या काही बहाद्दरांना हा अभिनय तेव्हढा जमायचा नाही. तुकडा तोंडात टाकल्यावर काढा प्यायल्यासारखा चेहेरा करायचा आणि तोंडाने मात्र योशिदांना सांगायचं 'छान होती. धन्यवाद". आता हा विरोधाभास, ते चेहेर्‍यावरचे कडू भाव योशिदांपासून लपणारेत का! ते मला नंतर हळूच म्हणायचे, "खरं तर त्याला हे आवडलेलं दिसत नाही.." पुढेपुढे मग त्यांनी 'सेफ प्रॅक्टिस' म्हणून सरळ चॉकलेटचा बॉक्सच आणायला सुरुवात केली. :)
त्यांचं ३ वर्षांचं डेप्युटेशन अखेरीस संपत आलं. अर्थात आवश्यकतेनुसार त्यानंतर ते काही दिवसांच्या बिझिनेस टूरवर येणारच होते. त्या दिवशीच्या फेअरवेल समारंभातल्या त्यांच्या औपचारिक भाषणानंतर प्रत्येकाला भेटून, हस्तांदोलन करुन ते निघून गेले. मला आवर्जून त्यांनी जपानला येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर मीसुद्धा ती कंपनी सोडली, नवीन ठिकाणी रुजू झाले. कामानिमित्त जपानलाही दोनदा वास्तव्य झालं. पण दुर्दैवाने मी तोक्योत आणि योशिदासान दूर दुसर्‍या राज्यात रहात असल्याने वेळेअभावि त्यांना भेटायचं राहून गेलं.

जपानमधल्या वास्तव्यात अनेक जपानी भेटले. पण योशिदांची सर कोणालाच नव्हती.आजही त्यांच्याकडून खुशालीची विचारपूस होते आणि मेलमध्ये जपानला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रणही न चुकता दिसतं...आता मात्र जपानची वारी परत झालीच तर त्यांना न भेटता जपान सोडायचा नाही असं ठरवलंय!

समाप्त.
-वर्षा

28 December 2007

ब्लॉगअड्डा (BlogAdda)

Visit blogadda.com to discover Indian blogs

25 December 2007

'तारे जमींन पर'

सावधान: खालील मजकुरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

आमिरखानचा 'तारे जमींन पर' नुकताच प्रदर्शित झालाय. मी चक्क हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात लागलीच जाऊन पाहिला! (एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्‍यांपैकी मी एक!:)) पण 'तारे..' च्या आधीपासून झळकणार्‍या झलका हा चित्रपट लगेच पाहायचा निर्णय घ्यायला पुरेश्या ठरल्या! कारण मुख्यत्वे प्रेमाचे त्रिकोण, चौकोन, पंच किंवा षट्कोन, लंडन-न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर उबळणारे देशप्रेम, भांगडा आणि सरसों का साग, उबग आणणारे आलिशान प्रासादातले बेगडी कौटुंबिक जिव्हाळे या सर्वांचा सुखद अभाव त्यात प्रकर्षाने जाणवला!

एक आमिरखान सोडल्यास एकही सुस्थापित 'स्टार' चेहरा यात नाही. पण म्हणून या बाकीच्या अपरिचित तार्‍यांची प्रभा काही कमी नाही. सगळ्यात प्रभावी तारा तर 'ईशान' (दर्शिल सफारी) आहे. या मुलाची या भूमिकेसाठी निवड करून आमिरखानने 'पर्फेक्ट निवड' म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरणच समोर ठेवलंय. हाही चेहरा पूर्वी कुठे पाहिल्याचं स्मरणात नाही...त्याच्या ट्प्पोर्‍या डोळ्यांत अनेक भाव उमटतात...डोळ्यांनी हा मुलगा बोलतो! त्याच्या ओठातून पुढे झुकलेले आणि ठळकपणे दिसणारे सशासारखे दोन दात त्याचा तिसरीतल्या मुलाचा अबोध आणि निरागस चेहरा पूर्ण करतात. अभिनय तर त्याने लाजवाब केलाय. कित्येकदा त्याच्या टपोर्‍या डोळ्यांतलं पाणी आपल्याही डोळ्यांतनं कधी पाझरू लागतं आपल्यालाच कळत नाही!


त्याचे आईवडील किंवा त्याच्या मोठ्या भावापासून ते त्याचे शिक्षक, मित्र या सर्वांच्या निवडी त्या त्या भूमिकेसाठी इतक्या यथार्थ आहेत कुठेही आपण चित्रपटातले नट-नट्या पाहतोय असं जराही जाणवत नाही. सगळी पात्रं अगदी आपल्या अवतीभवतीची, सुपरिचित वाटतात. पात्रांच्या निवडीप्रमाणेच चित्रपटातलं एकंदर वातावरणही आपलंसंच वाटतं. चित्रपटाचा नायक हा आलिशान बंगल्यात न राहता तुमच्याआमच्यासारखा सोसायटीत राहतो. सगळी मुलं मिळून बिल्डिंगच्या आवारात किंवा गच्चीवर खेळतात. स्कूलबसने शाळेत जातात. बाबांचा 'कारोबार' नाहीये तर ते ऑफिसला जातात आणि आई जॉब, करियर सोडून गृहिणीपद चोख बजावतेय...सकाळी नवरा-मुलांचा डबा-नाश्ता तयार करण्यापासून ते मुलाला स्कूलबसपाशी सोडायला जाताना घाईघाईत गाऊनवरच ओढणी घेऊन जाणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा दिग्दर्शकाने अचूक दाखवल्यात :)


हा पोरगा इतर पोरांहून जरा 'वेगळा' आहे. जरा म्हणजे त्याला लिहावाचायला जमतच नाही...अक्षरं, आकडे फेर धरून नाचतात त्याच्या डोळ्यांपुढे. वैज्ञानिक भाषेत डिसलेक्सिया म्हणतात त्याला. पण त्याला ही 'अडचण' असू शकेल हे त्याच्या आईवडीलांना कळतच नाही...खरं तर मोठ्या भावाच्या रूपातला एक हुशार आणि गुणी मुलगा घरात असल्याने धाकट्याला असा काही प्रॉब्लेम असेल असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. आणि मग यातून सुरू होतो तो बालमन आणि पालकांच्या अपेक्षा यातला एक न संपणारा संघर्ष. अभ्यास न जमणे आणि शेवटी त्याचे परिणाम परीक्षेत दिसू लागल्यावर आईवडीलांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांचा ओरडा खाणार्‍या ईशानचे मन दिवसेंदिवस कमकुवत होत जाऊन तो एक सतत मान खाली घालणारा अबोल आणि घुम्या स्वभावाचा मुलगा बनतो. त्याच्या मनातली वादळं त्याच्या मनातच राहतात...


ईशानच्या शैक्षणिक प्रगतिविषयी काळजी वाटून आणि तो 'वठणीवर' येईल या विचाराने मन घट्ट करून त्याचे आईवडील त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल करतात. तिथे जायची अजिबात इच्छा नसलेला ईशान मनातून खूप दुखावला जातो. पण त्या बोर्डिंग स्कूलमध्ये त्याची मानसिक अवस्था आणि घालमेल तिथला चित्रकला शिक्षक (आमिरखान) बरोबर ओळखतो. लहानपणी हाच प्रॉब्लेम असलेला तो शिक्षक ईशानला योग्य पण वेगळ्या तर्‍हेने शिकवून त्याची लिहावाचायची अडचण तर सोडवतोच पण त्याच्या मनात एक अनामिक आनंद आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास जागृत करतो.


तसं म्हटलं तर लिहिण्या-वाचण्याचा प्रॉब्लेम असलेल्या एका मुलाला त्याच्या शिक्षकाने मदत केली आणि त्यातून त्याला सहीसलामत बाहेर काढले अश्या एका वाक्यात या चित्रपटाची गोष्ट सांगता येईल पण प्रत्यक्षात या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत आणि ते न दाखवून चालणारच नाही. त्याची ही अडचण अधोरेखित करणारे अनेक प्रसंग किंवा छोट्या छोट्या गोष्टी सबंध चित्रपटात इतक्या सहजतेने दाखवल्यात की त्या अजिबात ओढूनताणून दाखवलेल्या किंवा जराही असंबद्ध वाटत नाहीत. साथीला त्याचं मानसिक द्वंद्व प्रतिबिंबित करणारे प्रसून जोशींचे शब्द आणि त्यांना लावलेली शंकर-एहसान-लॉय यांची चाल तर अप्रतिम!


आमिरखानचं दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही यावर्षीचे पुरस्कार घेऊन जातील यात शंका नाही. चित्रकार समीर मॉंडल यांच्या सुरेख पोर्ट्रेट्स-चित्रांचा चित्रपटात केलेला सहज वापर मुद्दाम लक्षात राहण्यासारखा. अक्षरं आणि आकड्यांशी वाकडं असणार्‍या ईशानला अक्षरं-आकडेरूपी किडे सर्वत्र सरपटताना दिसण्याचा प्रसंग तर लाजवाब. या आणि अशा कैक पैलूंनी हा चित्रपट एक नितांतसुंदर अनुभव बनलाय. असे विषय बॉलीवूडमध्ये हाताळले जातायत याचाच आनंद आहे आणि याचं श्रेय आमिरखान आणि अमोल गुप्ते आणि त्यांची टीम यांना द्यायलाच हवं!

'तारे जमीनपर' चे संकेतस्थळ:
तारे जमीनपर
सर्वांनी जरुर पाहावा असाच हा चित्रपट आहे.